Tue, Jul 16, 2019 02:10होमपेज › Sangli › कुर्‍हाडीचे वार करून महिलेचा खून

कुर्‍हाडीचे वार करून महिलेचा खून

Published On: Mar 01 2018 1:28AM | Last Updated: Mar 01 2018 1:28AMकडेगाव : वार्ताहर 

अमरापूर (ता. कडेगाव) येथे  कमल मल्लापा कुठेकर (वय 30) या महिलेचा तिच्या पतीनेच कुर्‍हाडीचे वार करून खून केल्याची घटना बुधवारी घडली. संशयित  मल्लापा नामदेव कुठेकर (मूळ रा. हुलजेती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) याला बारा तासांच्या आत पोलिसांनी अटक केली. याबाबतची फिर्याद दौलतराव मालोजीराव पाटील यांनी कडेगाव पोलिस ठाण्यामध्ये नोंदवली आहे.

कडेगाव पोलिस ठाण्यातून  मिळालेली माहिती अशी : अमरापूर येथे दौलतराव  पाटील यांचा कुक्कुटपालन व्यवसाय आहे. त्या पोल्ट्रीत मल्लापा कुठेकर पत्नी कमलसह गेल्या काही दिवसांपासून काम करीत होता. मल्लापा  दररोज सकाळी लवकर उठून कोंबड्यांना खाद्य व पाणी देण्याचे काम करीत असे. पोल्ट्रीपासून काही अंतरावर राहत असलेल्या मालकांच्या घरी तो रोज सकाळी पोल्ट्री शेडची किल्ली आणण्यासाठी जात असे; परंतु आज सकाळी तो किल्ली नेण्यासाठी आलाच नाही. त्यामुळे मालक पाटील यांच्या आई किल्ली देण्यासाठी कुठेकर याच्या खोलीकडे गेल्या. त्यावेळी त्यांना खोलीचा दरवाजा बंद असलेला आढळला.त्यांनी  हाक मारून दरवाजा ठोठावला.त्यावेळी  दरवाजा आपोआप उघडला गेला आणि  आत  कमल ही मृतावस्थेत पडलेली त्यांना दिसली. त्यांनी ती माहिती मुलगा दौलत पाटील यांना घरी जाऊन सांगितली. पाटील यांनी कडेगाव पोलिसांना ती माहिती दिली.

पोलिस निरीक्षक के.एस.पुजारी यांनी घटनास्थळी भेट देऊन  पंचनामा केला.कमल हिच्या गळ्यावर व तोंडावर खोलवर वार झाल्याचे आढळले. मृतदेहाशेजारी कुर्‍हाड पडलेली होती. त्याच कुर्‍हाडीने कमलचा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला . निरीक्षक पुजारी व सहाय्यक फौजदार एस. बी. शिरतोडे तपास करीत आहेत.