Tue, Apr 23, 2019 06:04होमपेज › Sangli › खूनप्रकरणी वाटेगावच्या एकास जन्मठेप

खूनप्रकरणी वाटेगावच्या एकास जन्मठेप

Published On: Apr 26 2018 2:03AM | Last Updated: Apr 26 2018 12:17AMइस्लामपूर : वार्ताहर

पैशांच्या कारणावरून वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील सागर विलास नलवडे (वय 28) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण खून केल्याप्रकरणी शंकर महादेव सावंत (वय 48, रा. वाटेगाव) याला बुधवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश आर. बी.  रोटे यांनी हा निकाल दिला. खुनाची ही घटना 5 ऑगस्ट 2015 रोजी कासेगाव येथे घडली होती. 

मृत सागर हा चालक म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन  होते. त्याचा मित्र आरोपी शंकर सावंत हा नेहमी त्याच्याबरोबर असायचा. घटनेआधी काही दिवस सागर व शंकर या दोघांनी मद्यप्राशन केले होते. शंकरला दारू जास्त झाल्याने तो रस्त्यावर पडला होता. त्यावेळी शंकरच्या खिशातील 10 हजार रुपये सागरने काढून घेतले होते. शंकर हा सागरला हे पैसे मागत होता. मात्र, सागरने पैसे देण्यास नकार दिल्याने तो चिडून होता. 

बुधवार, दि. 5 ऑगस्ट 2015 रोजी  रात्री पुणे-बंंगळूर महामार्गावर कासेगाव येथील एका हॉटेलमध्ये दोघांनी मद्यप्राशन केले. तेथेही पैशावरून दोघांची बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर हे दोघे जण हॉटेलमधून बाहेर पडले. त्यानंतर हे दोघे जण चालत कासेगाव येथील  नर्सरीजवळ गेले.

या ठिकाणी पैशावरून दोघांची पुन्हा बाचाबाची झाली. संतापलेल्या  शंकरने  धारदार सुर्‍याने सागरच्या पोटावर व तोंडावर सपासप वार केले. यामध्ये सागर रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मृत्यूमुखी पडला. त्यानंतर शंकरने तेथून पलायन केले. 

दुसर्‍या दिवशी खुनाचा हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कासेगाव पोलिस ठाण्यात विलास तातोबा नलवडे यांनी फिर्याद दिली होती. तत्कालिन सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी या खून प्रकरणाचा तपास करून येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

न्यायाधीश  रोटे यांच्यासमोर खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे 32 साक्षीदार तपासण्यात आले.  तपासाधिकारी नंदकुमार मोरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल अनिल रजपूत, विजय तळपे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वाठारकर व पंचांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या.  

न्यायालयाने याप्रकरणी शंकर सावंत यास  दोषी धरून जन्मठेप व 1 हजार रुपये दंड, दंड न दिल्यास 1 महिना सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. शुभांगी पाटील यांनी काम पाहिले. 

Tags : sangli, murder case, One life imprisonment, sangli news,