Sun, Aug 25, 2019 00:10होमपेज › Sangli › महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी

Published On: Dec 14 2017 1:46AM | Last Updated: Dec 13 2017 11:01PM

बुकमार्क करा

सांगली : शशिकांत शिंदे

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.   सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. काही राजकीय पक्षांनी सुधार समितीशी संपर्क साधला आहे. त्याचबरोबर अनेक आजी-माजी नगरसेवकांनीही समितीबरोबर संपर्क वाढवला आहे. सुधार समितीने अद्याप त्यांचे पत्ते गुलदस्त्यात ठेवले आहेत. पुढील आठवड्यात कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्याबाबत निर्णय होणार आहे.  

महापालिकेच्या आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी मोठ-मोठी आश्‍वासने दिली. मात्र सत्ता पालट होऊनही चांगले रस्ते, गटारी, स्वच्छ पिण्याचे पाणी असे साधे प्रश्‍न अद्याप सुटू शकलेले नाहीत. विकासाच्या मुद्यांऐवजी गैरकारभारावरच महापालिकेच्या सभा गाजल्या आहेत. 

या सगळ्या कारभाराविरोधात सांगली जिल्हा सुधार समितीने गेल्या तीन वषार्ंपासून मोहिम सुरू केली आहे. घनकचर्‍याच्या मुद्यावर त्यांनी  महापालिकेविरुद्ध दावा दाखल केला. सांगली साखर कारखान्यातून बाहेर पडणार्‍या राखेसंदर्भात आवाज उठवला. त्याची दखल कारखाना प्रशासनाला घ्यावी लागली. महापालिकेच्या एकाच रस्त्यातील कामाच्या दोनदा निविदा काढण्याचा घोटाळा  चव्हाट्यावर आणला.  

त्याशिवाय रस्ते, गटारीच्या कामाचा दर्जा, स्वच्छता, क्षेत्रसभा, महिलांसाठी स्वच्छता गृहे,  सिव्हिल परिसराची स्वच्छता आदि विविध प्रश्‍नांवर आवाज उठवल्यानंतर सुधार समितीच्या म्हणण्याची संबंधित यंत्रणांना दखल घ्यावी लागली. नागरी सुविधांच्या प्रश्नांवर समितीने  पदाधिकारी आणि अधिकार्‍यांना सातत्याने जाब विचारला. त्यांना जागेवर जाऊन प्रश्न समजावून घेण्यास भाग पाडले. महापालिका क्षेत्रात नागरी सुविधा, गैरकारभार याबाबत अनेकदा सुधार समितीनेच विरोधकाची भूमिका बजावली आहे. 

महापालिकेची निवडणूक जवळ आल्याने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादीकडून कारभाराविरोधात आंदोलने होत आहेत. सत्ताधारी काँग्रेस पक्षातील एक गट प्रसंगी विरोधकांची भूमिका घेत आहे. त्याचवेळी सर्वच राजकीय पक्षांपासून अंतर ठेवत सुधार समिती मात्र नागरी सुविधांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आहे. या समितीमधील कार्यकर्ते कोणत्याच प्रस्थापित राजकीय पक्षांशी फारसे सबंधित नाहीत. मात्र कार्यकत्यार्ंंनी केलेल्या कामामुळे समिती प्रकाशझोतात आली आहे. 

त्यामुळेच काँग्रेसचा अपवाद वगळता अन्य  पक्षांनी आता  समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. त्यात माजी मुख्मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी पक्ष, आमआदमी पार्टी यांंचाही समावेश आहे. सत्ता मिळवण्यासाठी राजकीय पक्षांना सुधार समितीची ताकद व प्रतिमा उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेले काही आजी-माजी नगरसेवकही समितीच्या संपर्कात आहेत. 

सुधार समितीने मात्र त्यांचे पत्ते अद्याप खुले केलेले नाहीत. दिल्लीत ज्या प्रमाणे आमआदमी पक्षाने नागरिकांच्या प्रश्‍नावर आवाज उठवत सत्तेत परिवर्तन घडवले. त्याप्रमाणे पारदर्शी कारभाराच्या मुद्यावर महापालिका क्षेत्रात परिवर्तनघडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचे याबाबत समितीचा  अद्याप निर्णय झालेला नाही. पुढील आठवड्यात कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. 

निवडणूक अजून सहा महिन्यांनी होणार आहे. प्रभाग रचना, आरक्षण अशी निवडणुकीची पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया अद्यापि झालेली नाही. ती झाल्यानंतर खर्‍या अर्थाने वातावरण तापायला सुरूवात होईल. तरी सुद्धा हालचाली मात्र आतापासूनच सुरू झाल्या आहेत.