होमपेज › Sangli › महापालिका निवडणूक होणार बहुरंगी

महापालिका निवडणूक होणार बहुरंगी

Published On: Mar 03 2018 1:44AM | Last Updated: Mar 02 2018 9:33PMसांगली : अमृत चौगुले

महापालिकेच्या सातव्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, महापालिका संघर्ष समिती आणि जिल्हा सुधार समितीसह अनेक पक्ष, आघाड्यांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अर्थात चार सदस्यीय पॅनेलची रचना आणि  प्रभाग मोठे आहेत. त्यामुळे सत्तेसाठी मतांचे समीकरण जुळविण्यासाठी पक्षीय आणि संघटनात्मक आघाड्याही होण्याची शक्यता आहे. परंतु मतांची गोळाबेरीज - वजाबाकी जमविण्यासाठी प्रसंगी स्वतंत्र लढूनही नंतर आघाड्यांचीही व्यूहरचना होऊ शकते. या कामाला या महिन्याअखेर प्रभागरचना आणि आरक्षण निश्‍चितीनंतर गती येणार आहे. 
सध्या सत्तेत असलेली काँग्रेस आणि विरोधातील राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडी या सर्वच पक्षांना गटबाजी आणि फुटीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे आता आगामी महापालिका निवडणूक या पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. 

यामध्ये काँग्रेस - राष्ट्रवादी ताकदवान पक्ष असले तरी मागील निवडणुकांत या पक्षांची केंद्र आणि राज्यातही सत्ता होती. आता मात्र केंद्र आणि राज्यात भाजप सत्तेत तर हे पक्ष विरोधक आहेत. शिवाय काँग्रेसच्या सत्तेची मदार ही प्रामुख्याने नेते (स्व.) मदन पाटील यांच्यावर होती.   त्यांना ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री प्रतिक पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, वसंतदादा पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी साथ दिली होती. त्याच आधारे काँग्रेस सत्तेवर आली होती. परंतु सर्वाधिकार मदन पाटील यांच्याकडेच होते. परंतु त्यांच्या हयातीतच गटबाजी आणि त्यातून 80 पैकी 42 सदस्य काँग्रेसचे असूनही पदाधिकारी निवडीत पाडापाडीचे राजकारण रंगले होते. 

आता काँग्रेसच्या  नेतृत्वाची धुरा श्रीमती जयश्री पाटील यांच्याकडे आली आहे. त्यांना डॉ. पतंगराव कदम, डॉ. विश्‍वजित कदम यांचे सहकार्यही आहे. परंतु काँग्रेसमध्ये गटबाजी अधिक वाढून तीन गटात विभागणी झाली आहे. यामध्ये उपमहापौर गट अधिक डोकेदुखी बनला आहे. त्यामुळे काँग्रेसला आता एकसंधतेबरोबरच सत्ता टिकविण्यासाठी ताकद पणाला लावावी लागणार आहे.

दरम्यान, महापालिकेत विरोधात असलेला राष्ट्रवादी पक्ष नेते आमदार जयंत पाटील यांच्या एकमेव नेतृत्वाखाली आहे. पण राष्ट्रवादीला शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, विधानसभा क्षेत्रअध्यक्ष कमलाकर पाटील गट असे गटबाजीचे ग्रहण लागले आहे. त्यातून दोघांचेही वेगवेगळे ‘कार्यक्रम’ आणि पोस्टरयुद्ध रंगलेले असते. दुसरीकडे राष्ट्रवादीत असले तरी काही नगरसेवक भाजपसोबत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला एकसंध ठेवण्याबरोबर सत्तेचे टार्गेट  गाठण्याचे मोठे आव्हान आहे. 

छोटा विरोधक असलेल्या स्वाभिमानी आघाडीला तर सर्वाधिक गटबाजीला समोर जावे लागत आहे. खुद्द नेते माजी आमदार संभाजी पवार हे भाजपमधून दूर गेले तरी दोन उपमहापौरांसह अन्य नगरसेवक, कार्यकर्त्यांची मोठी ताकद भाजपमध्ये गेली आहे. दुसरीकडे संभाजी पवार आणि त्यांचे पुत्र पृथ्वीराज यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला असला तरी तेथेही गटबाजी जोरात आहे. त्यातच नगरसेवक गौतम पवार यांनी स्वाभिमानीचा वेगळा सवतासुभा ठेवला आहे. यामध्ये संभाजी पवार गटाबरोबरच जनता दल, मनसेही सोबत आहे. त्यामुळे स्वाभिमानीचे पुढील निवडणुकीत अस्तित्व आणि भवितव्य काय, असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. 

मोदी लाटेच्या निमित्ताने गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात भाजपचा सर्वत्र बोलबाला वाढला आहे. लोकसभा, विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि अनेक ग्रामपंचायतींंही भाजपने काबीज केल्या आहेत. आता भाजपची मिशन महापालिका या मोहिमेसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. अर्थात तळागाळापर्यंत पोहोचलो नसलो तरी इनकमिंग आणि खासदार, आमदारांच्या विकासकामांच्या जोरावर भाजपला जनता साथ देईल, असा निर्धार केला आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेस-राष्ट्रवादीला घरघर लावून आम्ही महापालिका जिंकलीच, असा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दावा केला आहे. अद्याप हे सर्व हवेत इमले आहेत. प्रत्यक्षात काय घडते, हे काळच ठरवेल. परंतु भाजपला शुन्यातून सत्तेपर्यंत (किमान 38 सदस्यांपर्यंत) पोहोचावे लागणार आहे.

काँग्रेसमधून आलेले जिल्हा संघटक दिगंबर जाधव, उपमहापौर गटाचे नेते शेखर माने यांच्यामुळे शिवसेनेला महापालिका क्षेत्रात उर्जितावस्था आली आहे. त्यानुसार जुन्या-नव्या गटांना एकत्र घेऊन शिवसेनेने निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. पण त्यांच्यातही गटबाजीचे ग्रहण आहेच. यातून एकसंध शिवसेना निवडणुकीला कशी समोर जाणार, हा प्रश्‍न आहे.

मिरज पॅटर्नचा गेली अनेक वर्षे बोलबाला आहे. माजी महापौर इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी, मैनुद्दीन बागवान यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य नगरसेवकांनी मात्र मिरज संघर्ष समितीद्वारे वेगळाच झेंडा हाती घेतला आहे. आता पुढे भाजप-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गळाला कोण लागणार, हा वेगळाच प्रश्‍न आहे.

मनपातील भ्रष्टाचाराविरोधात पोलखोल करणारी संघटना म्हणून पुढे आलेल्या सांगली जिल्हा सुधार समितीनेही आता निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. त्यांनीही आम्ही जनतेसमोर विकासकामांचा मुद्दा घेऊन जाऊ असे सांगत सर्वच पक्षांना आव्हान दिले आहे. ते आता जनतेपर्यंत कितपत पोहोचणार, हे निवडणुकीतच समजेल.  

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सर्वपक्षीय कृती समिती, रिपब्लिकन पक्षासह विविध पक्ष, अपक्षांची फौजही निवडणुकीत उतरेल. मात्र यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार का, ती निवडणुकीपूर्वी की नंतर, यातून भाजपच्या गळाला किती लागणार, अन्य पक्षांच्या कोणाबरोबर आघाड्या होणार, अशी अनेक प्रश्‍नांवरच महापालिका निवडणुकीत मतांचे राजकारण आणि त्यातून सत्तेचा खेळ रंगेल. अर्थात यामध्ये प्रभागरचना आणि त्याद्वारे 20 मार्चला  जाहीर होणार्‍या आरक्षणावर भवितव्य ठरणार आहे. 

यातून विद्यमान तसेच इच्छुकांना कशा संधी मिळणार, यावर खरा राजकीय  खेळ रंगणार आहे.  आधारेच पक्षांच्या उमेदवारांपासून ते संधी मिळविण्यासाठी तत्पर असलेल्या  विजयासाठी दलबदलू राजकारणाला गती येईल.   निवडणूकपूर्व राजकीय रंग तूर्त तरी जोरात आहेत. त्यामुळे निवडणूक  बहुरंगीच नव्हे तर ताकदीने होणार, हेही स्पष्ट आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे सर्वांची नजर....

महापालिका निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने निवडणूक जिंकूच, असा निर्धार व्यक्त करीत  जाहीरपणे तयारी सुरू ठेवला आहे. यासाठी फोडा आणि सत्ता मिळवा असा फॉर्म्युलाही त्यांनी जाहीर केल्याची टीका होत आहे. त्यासाठी विविध मंत्री, पक्षीय पदाधिकार्‍यांच्या सभांद्वारे शक्तिप्रदर्शनही सुरू केले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फुटीची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे बेकीच्या राजकारणातून भाजपला संधी मिळू नये यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांनी चर्चेपूर्वी आघाडीचा बोलबाला सुरू ठेवला आहे. पण प्रभागात इच्छुकांचा ताळमेळ आणि त्यातून आघाडी कशी होणार,  ते महत्त्वाचे आहे. त्याआधारेच काँग्रेस-राष्ट्रवादीतून भाजपच्या वाटेवर असलेल्यांची भूमिका ठरतील. त्यामुळे या आघाडीकडे या दोन्ही पक्षासह भाजपच्या नजरा लागल्या आहेत.