Mon, Jul 15, 2019 23:40होमपेज › Sangli › प्रभाग जोडल्याने तुल्यबळ लढती रंगणार

प्रभाग जोडल्याने तुल्यबळ लढती रंगणार

Published On: Mar 07 2018 12:16AM | Last Updated: Mar 06 2018 11:16PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या सातव्या निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभागवार रचना तयार केली आहे. ती आता राज्य निवडणूक आयोगाच्या हवाली केली आहे. परंतु चार सदस्यीय पॅनेल पद्धती असल्याने विद्यमान चार सदस्यांचा बांधाला बांध लागला आहे, हे उघड आहे. शिवाय इच्छुकही ‘वजनदार’ असणार आहेत. त्यामुळे या लढती तुल्यबळ होणार, हे निश्‍चित आहे. 

सत्ताधारी काँग्रेस, विरोधक राष्ट्रवादी, स्वाभिमानीसह यावेळी केंद्र, राज्य ते ग्रामपंचायतींपर्यंत बाजी मारणारा भाजप हा प्रमुख पक्ष मैदानात आहे. सर्वच पक्षांना मुंबईतून रसद मिळणार हे स्पष्ट आहे. नेत्यांच्या तोफा सांगलीत येऊन धडाडणार आहेत. यामुळे महापालिका निवडणूक ही बहुरंगी होणार हे स्पष्ट आहे. 

निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रारूप प्रभाग रचना तयार केली आहे. ती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केली  आहे. यामध्ये राज्य निवडणूक आयोगाकडूनही काही सुचनांसह दुरुस्ती सुरू असल्याचे समजते. त्यानुसार दुरुस्त प्रभागरचना व आरक्षणाचा अहवाल दि. 13 मार्चपर्यंत महापालिकेकडे येईल. त्यावर पुन्हा मनपातर्फे शिक्कामोर्तब होऊन दि. 20 मार्चला ती खुली होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

अर्थात प्रभागरचना कशीही झाली तरी सत्तेची समीकरणे त्या-त्या भागातील विद्यमान नगरसेवक तसेच इच्छुकांच्या व्होट बँकेवरच ठरणार आहेत. यामध्ये काँगेस-राष्ट्रवादी शहरात प्रबळ आहे. स्वाभिमानी आघाडीचेही काही प्रभागात प्राबल्य होते. पण त्यांच्यातील सर्वच घटक पक्षांच्या आता वाटा वेगळ्या झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याही अस्तित्वाचा प्रश्‍न आहे. दुसरीकडे भाजपने महापालिका जिंकणारच, असा दावा केला आहे. परंतु त्यांची सर्व मदार स्व:बळाऐवजी आयात कार्यकर्त्यांवरच आहे. त्यासाठी प्रभागरचना आणि आरक्षणानुसार उमेदवारीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीतील होणारा संघर्ष हा भाजपचे सावजच आहे. यातून फोडाफोडीद्वारे  वजनदार इच्छुकांसाठी भाजपमध्ये  दार खुले आहे. मतांच्या राजकारणातून इच्छुकांना शिवसेना, जिल्हा सुधार समिती, महापालिका संघर्ष समिती असे अनेक पर्याय खुले आहेत. एकूणच आता प्रभागरचना आणि आरक्षणाच्या निश्‍चितीनंतर यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला गती येणार आहे.  

यातूनच कोणते पक्ष थेट आमने-सामने, आघाड्या झाल्या तरी बहुसंख्य प्रभागात विद्यमान नगरसेवकांत विविध पक्षांतून तुल्यबळ लढती रंगणार आहेत. प्रसंगी प्रभागात एकमेकांच्या कार्यक्षेत्र विस्तारानुसार अंतर्गत मैत्रीपूर्ण लढती ठरणार आहेत. त्यादृष्टीने काहींनी खुलेआम चर्चाही सुरू केली आहे.  त्यामुळे कोणीही सत्तेचा दावा केला तरी या सर्वांतून कोण किती जागांवर बाजी मारते यावर सत्तेची समीकरणे ठरणार आहेत.