Wed, Apr 24, 2019 15:32होमपेज › Sangli › एकदिलाने लढण्याचे शिवसेनेसमोर आव्हान

एकदिलाने लढण्याचे शिवसेनेसमोर आव्हान

Published On: Apr 17 2018 1:51AM | Last Updated: Apr 16 2018 8:37PMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनाही मैदानात उतरणार आहे. त्यासाठीच रविवारी येथे पक्षातर्फे मेळावा घेण्यात आला. प्रत्यक्षात संघटनात्मक बाबींवरून मुंबईतून आलेल्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. यातून नेत्यांनीच शहरातील शिवसेनेच्या ताकदीचा आरसा दाखविला आहे. 

त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख गजानन किर्तीकर यांनी संघटनेची पुनर्रचनाच करणार असल्याचे संकेतच दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा मेळावा परखड आत्मपरीक्षणामुळेच गाजल्यामुळे आता  निवडणूक तयारीबरोबरच संघटनात्मक पुनर्रचनेचीही गडबड सुरू होण्याची शक्यता आहे.   

कोणतीही निवडणूक जवळ आली, की शिवसेनेचे मेळावे येथे होतात. पक्षाचा  झेंडा फडकवण्याच्या घोषणा होतात, मात्र नंतरच्या काळात फारसे काही होत नाही असा आजपर्यंतचा अनुभव आहे. ताज्या मेळाव्यातही महापालिकेची सत्ता ताब्यात घेण्याची घोषणा करण्यात आली आहे.  मात्र  ती कशी ताब्यात घेणार, त्यासाठी पूर्वतयारी केव्हा व कोणत्या प्रकारे करणार याचा कोणताच  आराखडा तूर्त तरी तयार झालेला दिसत नाही. 

शिवसेनेतील मूळचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नव्याने सहभागी झालेले नेते यांचे मनोमीलन झाल्याचे दिसत नाही. जिल्ह्यात खानापूर-आटपाडीचे आमदार अनिलराव बाबर हे पक्षाचे एकमेव आमदार आहेत. मात्र, तेसुद्धा राष्ट्रवादीतून आलेले आहेत. खानापूर पंचायत समितीवर शिवसेनेची म्हणजेच बाबर गटाचीच सत्ता आहे. 

राज्यातील  सत्तेत भाजपबरोबर शिवसेना सहभागी आहे. मात्र राज्यपातळीवर या दोन्ही पक्षांचे जसे ‘सौहार्दपूर्ण’ संबंध आहेत, तसेच ते जिल्ह्यातही आहेत. जिल्ह्यातील कोणत्याच कामात किंवा कार्यक्रमात दोन्ही पक्षांचे नेते, कार्यकर्ते एकत्र आले आहेत, असे दिसलेले नाही, दिसत नाही. शिवसेनेच्या स्थानिक नेते किंवा कार्यकर्त्यांना त्यांचा पक्ष राज्यातील सत्तेत असल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे ते  संधी मिळेल तेव्हा सरकारवर जोरदार टीका करतात. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्यता खुद्द त्या दोन्ही पक्षांचे नेतेही व्यक्त करीत नाहीत. माजी आमदार संभाजी पवार यांचा गट भाजपमधून शिवसेनेत आला आहे. त्यांचा भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांशी चांगला परिचय आहे. अधूनमधून त्यांच्या भेटीही होत असतात. मात्र स्थानिक पातळीवर त्यांचे खासदार संजय पाटील गटाशी अजिबात पटत नाही. तसेच सांगली विधानसभा मतदारसंघाबाबतही संघर्ष आहेच. त्यामुळे युती होणे कठीण आहे. 

त्यामुळे स्थानिक पातळीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप असे पक्ष वगळता अन्य पक्ष व संघटनांबरोबर शिवसेनेची निवडणूक आघाडी होऊ शकते. मात्र त्यासाठी एकमुखी किंवा सामुदायिक नेतृत्व पध्दतीने कुणीतरी निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रभागांचा आकार मोठा आहे. प्रत्येक प्रभागात चार असे 78 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार शोधून त्यांच्या मागे संघटनेची ताकद उभी करावी लागेल. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहेत. 

केवळ मेळाव्यातील भाषणे आणि घोषणांनी ते काम होणार नाही. त्याचबरोबर मुळात संघटनात्मक रचना बळकट करावी लागेल. तशी ती नसल्यानेच ताज्या मेळाव्यात वरिष्ठ नेते संतप्त झाले होते.

Tags : sangli, municipal corporation Election, Challenge before Shivsena, sangli news,