Fri, Nov 16, 2018 21:43होमपेज › Sangli › अळ्यामिश्रित पाणीपुरवठा

अळ्यामिश्रित पाणीपुरवठा

Published On: Jan 08 2018 1:15AM | Last Updated: Jan 07 2018 11:08PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी 

शहरात अनेक दिवसांपासून अनेक भागांत अळ्या व गाळमिश्रित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया आहेत. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी हिराबाग जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी उकळून घ्यावे, असे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शीतलनाथ उपाध्ये यांनी सांगितले.

ते म्हणाले, खणभाग, गावभाग, शामरावनगर, सांगलीवाडी या परिसरात दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. अनेक भागांत पाण्यात अळ्या आढळून आल्या आहेत. तसेच मातीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा विभागाने तीनही संप व पंपगृहांचे वॉशआऊट केले होते; पण त्यानंतरही दूषित पाणीपुरवठा सुरूच राहिला आहे. महापालिकेने 70 एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राची चाचणी सुरू केली आहे.

उपाध्ये म्हणाले, या जलशुद्धीकरण केंद्रातून हिराबागसह इतर पाण्याच्या टाक्यांना सात ते आठ वर्षापूर्वी जलवाहिन्या जोडल्या होत्या. पण या वाहिन्या कार्यान्वित झालेले नव्हता. आता जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर या वाहिन्याची चाचणी घेतली जात आहे. सात ते आठ पाण्याच्या टाक्या नव्याने भरून घेण्यात आल्या आहेत. आकाशवाणी व पोळ मळा येथील पाण्याच्या टाकीची चाचणीही पूर्ण झाली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात 70 एमएलडी केंद्रातून सांगली व कुपवाडला शुद्ध पाणीपुरवठा सुरू होती. तत्पूर्वी चाचणीमुळे अनेक भागात अळ्या व गाळमिश्रित पाण्याचा पुरवठा होऊ लागला आहे. ही बाब लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाने हिराबाग जलशुद्धीकरण केंद्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.