Tue, Jul 16, 2019 11:37होमपेज › Sangli › मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन

Published On: Aug 09 2018 1:37AM | Last Updated: Aug 08 2018 10:58PMसांगली : प्रतिनिधी

मराठा आरक्षण देण्यास राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ बुधवारी स्टेशन चौकात क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तिसर्‍या दिवशीही ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, गुरुवारी जिल्हा बंदचे तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. गावागावांत निषेध फेरी काढण्यात येणार आहे. तसेच प्रमुख मार्गांवर चक्‍काजाम आंदोलन होणार आहे. सांगलीत हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने ठिय्या आंदोलन होणार आहे.

आरक्षणासाठी  दोन दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास  मोठा प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी स्टेशन चौकातील वसंतदादा पुतळ्यासमोर झालेल्या धरणे आंदोलनात शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. विविध सामाजिक संघटना तसेच सर्व समाजांतून आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. आरपीआय, मुस्लिम आणि शिक्षक संघटनांनीही या आंदोलनास पाठिंबा दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी बोधिसत्व माने, महादेव होवाळ यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. शिक्षक समितीचे पदाधिकारी बाबासाहेब लाड व पदाधिकार्‍यांनीही आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा दिला. मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.  

बहुजन क्रांती मोर्चाचे नामदेव करगणे, शाहीन शेख, वनिता पटेल, सामाजिक कार्यकर्ते चंदन चव्हाण,  माजी नगरसेवक  शेखर माने यांच्यासह अनेक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी,  व्यक्‍तींनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दिला. व्यापारी असोसिएशन, सराफ असोसिएशन, रिक्षा संघटना, विष्णूअण्णा फळ मार्केटमधील व्यापारी संघटनेनेही बंदला पाठिंबा जाहीर केला.

आंदोलनात समन्वयक महेश खराडे, सतीश साखळकर, संभाजी पोळ, अजय देशमुख, विजयकुमार दळवी, ए.डी. पाटील, महेश घारगे, डॉ. संजय पाटील, प्रतापसिंह पाटील, श्रीरंग पाटील, विजय महाडिक, नानासाहेब कदम, शिवाजी मोहिते, योगेश सूर्यवंशी,  आशा पाटील, संजय देसाई, दिनकर पाटील,  बापूसाहेब गिड्डे,  पंडितराव पाटील, प्रवीण पाटील,  विलास देसाई, अमोल सूर्यवंशी, अशोक पाटील, चंद्रकांत पाटील, विजय पाटील, राजेंद्र पाटील,  योगेश पाटील,  संकेत परब, राहुल पाटील, कविता बोंद्रे, रोहित शिंदे, अंकित पाटील, राहुल पाटील, सुशांत पवार, बाळ सावंत, एम. जे. पाटील यांंच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा आंदोलनस्थळी   देण्यात आल्या.  

महेश खराडे, सतीश साखळकर म्हणाले, आरक्षणाचा प्रश्‍न रेंगाळत राहिल्याने  समाजातून उद्रेक होत आहे. त्यामुळे तरुणांत नैराश्य आल्याने ते  आत्महत्या  करीत आहेत. याबाबत सरकारने तातडीने मार्ग काढावा, अन्यथा हा उद्रेक शांत होणार नाही. गुरुवारी शहरात व  जिल्ह्यात सर्वत्र बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील  प्रत्येक गावात सकाळी निषेध फेरी काढली जाईल. त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समाजातील बांधवांनी जमून ठिय्या आंदोलन करतील. महापालिका क्षेत्रात सकाळी   निषेध फेरी काढल्यानंतर  स्टेशन चौकात आंदोलन होईल. मिरज तालुक्यातील समाजबांधव सांगलीतील आंदोलनात सहभागी होणार आहेत.  

शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, आटपाडी, जत या  सर्व तालुक्यात  बंद, रास्ता रोको, धरणे आंदोलन  केले   जाणार  आहे. दरम्यान, मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ केल्याचा निषेध म्हणून राज्य सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे बुधवारी स्टेशन चौकात क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दहन केले. 

शाळांना आज सुटी; मोठा पोलिस बंदोबस्त

आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर रास्ता रोको केला जाणार आहे. आंदोलन शांततेच्या मार्गाने करायचे आहे. कोणीही बस फोडू नयेत. शासकीय मालमत्तांचे नुकसान होणार  नाही, याबाबतची दक्षता समाजातील तरुणांनी घ्यावी, असे आवाहन क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर शहरांसह जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रशासनाने सुटी जाहीर केली आहे; पण आंदोलनास हिंसक वळण लागण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी सर्वच ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. आंदोलकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस व जिल्हा प्रशासनाने केले आहे.