Thu, Jun 27, 2019 02:07होमपेज › Sangli › सांगली : प्रसुतीवेळी महिलेसह बाळ दगावले; नातेवाईकांचा गोंधळ

सांगली : प्रसुतीवेळी महिलेसह बाळ दगावले; नातेवाईकांचा गोंधळ

Published On: Apr 06 2018 2:53PM | Last Updated: Apr 06 2018 2:52PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात (सिव्हील) प्रसुतीवेळी अतिरक्तस्त्राव झाल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिच्या अत्यवस्थ बाळाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी मृत महिलेचे नातेवाईक आक्रमक झाले होते. संबंधित डॉक्टरांना निलंबित करण्याची मागणी करत त्यांनी तीन तास सिव्हीलमध्ये गोंधळ घातला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

रेहाना उस्मानगणी मुतवल्ली (वय 23, रा. बेघर सोसायटी, संजयनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या पतीसमवेत संजयनगरमधील बेघर सोसायटीत राहत होत्या. त्यांचे पती फरशी बसविण्याचे काम करतात. त्यांना अडीच वर्षांचा एक मुलगाही आहे. बुधवारी सायंकाळी रेहाना यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांना सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित डॉक्टरनी अजून दिवस पूर्ण झाले नाहीत, असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने रेहाना यांचा त्रास अधिक वाढल्याने पुन्हा तपासणी केल्यावर दिवस पूर्ण झाले असून तातडीने सिझर करावे लागेल, असेही नातेवाईकांना सांगण्यात आले. 

त्यांची पहिली प्रसुती सिझर झाल्याने आताही सिझर करावे, असा आग्रह नातेवाईकांनी सिव्हीलमधील डॉक्टरांकडे धरला होता. मात्र, डॉक्टरांनी त्याकडे दुर्लक्ष करीत नॉर्मलसाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांची नॉर्मल प्रसुती झाली. मात्र, प्रसुतीनंतर बाळाची तब्येत खालावल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर रेहाना यांचीही प्रकृती अचानक बिघडली. त्यांना रक्तस्त्राव सुरू झाला. 

अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरनी नातेवाईकांकडून अर्ध्या तासात आठ बाटल्या रक्त मागवून घेतले. नातेवाईकांनी शहरभर धावपळ करून रक्त उपलब्ध करून दिले. मात्र, रेहाना यांचा अति रक्तस्त्रावाने मृत्यू झाला. ही माहिती समजल्यानंतर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांसह, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सिव्हील हॉस्पीटल परिसरात जमा झाले. 

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच रेहाना यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी चांगलाच गोंधळ झाला. सुमारे अडीचशे ते तीनशे जणांचा जमाव यावेळी जमा झाला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिस उपअधीक्षक अशोक विरकर, निरीक्षक प्रताप पोमण, सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील फौजफाट्यासह सिव्हीलमध्ये दाखल झाले. त्यांनी नातेवाईक, राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. 

दुपारी बाराच्या सुमारास नातेवाईकांची अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी भेट घालून देण्यात आली. यावेळी नातेवाईकांनी त्यांचा लेखी तक्रार अर्ज डॉ. सापळे यांना दिला. त्यानंतर त्यांनी याबाबत समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर जमाव शांत झाला. सायंकाळी  उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. 

यावेळी राष्ट्रवादीचे शहर-जिल्हाध्यक्ष संजय बजाज, महिला जिल्हाध्यक्षा विनया पाठक, आयेशा शेख, अनिता पांगम, संध्या आवळे, उमर गवंडी, दीपक माने, सर्वपक्षीय कृती समितीचे आसिफ बावा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

सिव्हीलमध्ये तोडफोड

दरम्यान सकाळी नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी सिव्हीलमध्ये गोंधळ घालत तेथे तोडफोड केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये हॉस्पीटलमधील खुर्च्यांचे नुकसान झाले आहे. 


प्रसुतीनंतर आणखी एका बाळाचा मृत्यू

दरम्यान, रेहाना यांच्यासह त्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी पावणेसहाच्या सुमारास प्रसुतीवेळी आणखी एका बाळाचा सिव्हीलमध्ये मृत्यू झाला. तारदाळ (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मी संतोष पाटील (वय २३) यांच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यांना बुधवारी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांचेही पूर्वी एक सिझर झाले होते. आताही नातेवाईकांनी सिझरसाठी आग्रह धरला होता. मात्र, डॉक्टरांनी त्यांच्याकडेही दुर्लक्ष केले. नॉर्मलसाठी प्रयत्न करूनही लक्ष्मी यांची प्रकृती खालावल्याने सकाळी पावणेसहाच्या दरम्यान त्यांचे सिझर करण्यात आले. परंतु, त्यांचेही बाळ दगावले. त्यांच्याही नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरविरोधात अधिष्ठाता डॉ. सापळे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. 

डॉक्टरवर कारवाई न झाल्यास कायदेशीर लढा : पाठक

सिव्हीलमध्ये गेल्या १८ तासात एक महिला आणि दोन बाळांचा मृत्यू झाला आहे. रेहाना यांच्याबाबत संबंधित डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. येथील लिफ्ट बंद असल्याने त्यांना उचलून वार्डमध्ये नेण्यात आले. या डॉक्टरना गर्भवतीचा महिना कळत कसा नाही? रेहाना मुतवल्ली आणि त्यांच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणी संबंधित डॉक्टर आणि स्टाफला तात्काळ निलंबित करावे. आम्ही या घटनेबाबत चौकशी करायला गेल्यानंतर डॉ. गायकवाड यांनी अपमानास्पद वागणूक दिली आहे. नंतर अधिष्ठातांची भेट घालून देण्यात आली. मात्र, त्यांनी आम्हाला आणि रेहानाच्या नातेवाईकाना न कळणार्‍या भाषेत काहितरी सांगितले, असा आरोप महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष विनया पाठक यांनी पत्रकारांशी बोलताना केला. 


डॉक्टरांच्या निष्काळजीपणानेच मृत्यू : नियाज शेख

रेहानाची पहिली प्रसुती सिझर झाली होती. आम्ही तिला सिव्हीलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरना सिझर करण्याची विनंती केली होती. पण त्यांनी नॉर्मल प्रसुतीला प्राधान्य दिले. प्रसुतीनंतर बाळाची तब्येत बिघडली. नंतर रेहानाचीही प्रकृती बिघडली. त्यानंतर अर्ध्या तासात डॉक्टरनी आठ रक्ताच्या बाटल्या आणायला सांगितल्या. शिवाय महागडी औषधेही बाहेरून आणायला सांगितली. इतके करूनही रेहानाचा प्राण वाचू शकला नाही. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच तिचा मृत्यू झाला आहे. याबाबत आम्ही अधिष्ठातांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी चौकशी करून कारवाईचे आश्‍वासन दिले आहे, असे रेहानाचे वडील नियाज शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


सिव्हीलमध्ये प्रसूतीसाठी दाखल असलेल्या रेहाना मुतवली या महिलेच्या आणि तिच्या बाळाच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी तातडीने समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल रात्रीपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. संबधित महिलेचे पती आणि वडीलांशी चर्चा करुन त्यांना तक्रार अर्ज देण्यास सांगितले आहे. सोमवारी त्यांच्याशी संबधित नातेवाईकांना बोलावून त्यांच्या प्रत्येक शंकेचे निरसन केले जाईल. चौकशी समितीच्या अहवालानंतर डॉक्टर दोषीं आढळलेतर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. या घटनेचे निमित्त करुन हॉस्पीटलमध्ये गोंधळ घालून सरकारी मालमत्तेचे नुकसान करणारे, इतर रुग्णांना त्रास होईल, असे वर्तन करणार्‍यांविरूद्ध पोलिसांत तक्रार केली आहे.  पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांचीही भेट घेऊन हॉस्पीटलमध्ये गोंधळ घालणारांची चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची विनंती करणार आहोत. 

- डॉ. पल्लवी सापळे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Tags : sangali, sangali news, civil hospital, delivery