Fri, Mar 22, 2019 02:06
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › संविधान सन्मानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

संविधान सन्मानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Published On: Sep 11 2018 1:41AM | Last Updated: Sep 10 2018 11:56PMसांगली : प्रतिनिधी

संविधानाचा सन्मान करा, अवमान करणार्‍यांना कठोर शासन करा या मागणीसाठी सोमवारी येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर  धडक मोर्चा काढण्यात आला. भाजप आणि शिवसेना वगळता अन्य सर्व राजकीय पक्षातील नेते आणि  कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. 

दिल्लीत संविधानाची प्रत जाळणार्‍यांवर  आणि त्यावेळी बघ्याची भूमिका घेणार्‍या पोलिसांवर  देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी, संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी करावी, शालेय अभ्यासक्रमात राज्यघटनेचा समावेश करावा, संविधान दिवस भव्य स्वरुपात साजरा करावा, या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकापासून सकाळी 12 वाजता मोर्चा सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रभागी राष्ट्रध्वज होता. त्यानंतर महिला, महाविद्यालयीन युवती त्यानंतर पुरुष आणि महाविद्यालयीन विद्यार्थी होते. 

संविधानाची प्रतिकृती मोर्चामध्ये होती. मोर्चामध्ये देशभक्तीपर आणि संविधानाच्या सन्मानाच्या घोषणा देण्यात येत होत्या. शांततेत आणि शिस्तबद्धपणे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. खा. राजू शेट्टी, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे सुरेश पाटील,  डॉ. बाबूराव गुरव, उमेश देशमुख, डॉ. संजय पाटील, महेश खराडे, सतीश साखळकर, अ‍ॅड. के. डी. शिंदे, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, अशिष कोरी, सचिन सवाखंडे आदींसह अन्य कार्यकर्ते सहभागी  होते.