Fri, Jul 19, 2019 05:02होमपेज › Sangli › मोदींची वाटचाल सावरकरांच्या राष्ट्रवादाने

मोदींची वाटचाल सावरकरांच्या राष्ट्रवादाने

Published On: Apr 22 2018 1:13AM | Last Updated: Apr 21 2018 10:55PMसांगली : प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाच्या विचारांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. त्यांनी देशातून काळा पैसा हद्दपार केला, म्हणून काँग्रेससह सर्वच विरोधक हतबल झाले आहेत, असा आरोप स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. दा. वि. नेने (दादूमियाँ) यांनी केला. येथील सावरकर प्रतिष्ठानच्या प्रांगणात शनिवारी साहित्य संमेलनाचे खासदार शरद बनसोडे यांच्याहस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे अभ्यासक रघुनाथ गोखले, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विजय नामजोशी, सुहास जोशी आदी प्रमुख उपस्थित होते. डॉ. नेने म्हणाले, परंतु विरोधकांचे सर्व मनसुबे धुळीस मिळणार आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर ते एकत्र येऊन आकांड तांडव करीत आहेत. परंतु पंतप्रधानपदाची प्रत्येकाची स्वप्ने असल्याने त्यांच्यात लाथाळ्या सुरू होतील.

डॉ. नेने म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रपती, तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते. परंतु  तत्कालीन सत्ताधीशांनी त्यांना राजकीय स्पर्धक मानून इंग्रजांच्या मदतीने त्यांचे खच्चीकरण केले. समाजहिताचे त्यांचे निर्णय उधळून लावण्याचे षङ्यंत्र रचले. 

डॉ. नेने म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतचे सर्व सत्य आणि इतिहास काँग्रेसच्या सत्ताकाळात आतापर्यंत दडपला गेला होता. कोणी याबाबत बोलायलाही  बंदी होती. पण  2014 मधील मोदींच्या परिवर्तनवादी लाटेने विचारांचेही परिवर्तन झाले. सावरकरांच्या विचारांना वाटा खुल्या झाल्या आहेत. 

सत्तेबाहेर राहिलेले विरोधक सज्ज

ते म्हणाले, आता काळ बदलला आहे. जगावर राज्य करायचे असेल मनुष्यबळ, जमीन नको आहे. त्यासाठी शस्त्रांची लढाईही अपुरी आहे. जर आर्थिक नाड्या हाती असतील तर सर्वत्र हुकूमत गाजविता येते. सुदैवाने त्यादृष्टीने खरे अर्थकारण व राजकारण करणारे पंतप्रधान  मोदी आहेत. हे आता जगालाही पटू लागले आहे. त्यातूनच मोदींनी खर्‍या अर्थाने सावरकरांच्या विचारांचा राष्ट्रवादी (शरद पवारांचा नव्हे म्हणताच उपस्थितांत हशा पिकला) देश बनवायला, त्यादृष्टीने कारभार करायला सुरुवात केली आहे.  शेवटी सत्ता असेल तरच राष्ट्रधर्म. त्यानुसार सत्ता काबीज करायला, ती कायम टिकवायला हवी. परंतु आता कधी नव्हे ते सत्तेबाहेर राहिलेले विरोधक निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा पैशाचा वाटेल तसा बाजार करायला सज्ज झाले आहेत. तुम्ही त्यांना मते देताना योग्य विचार करा.

खासदार बनसोडे म्हणाले, आजच्या घडीला सावरकरांचे नाव घेऊन राजकारण करता येत नाही. पण मी छातीठोकपणे सांगतो, मी सावरकरप्रेमी आहे. मला जनतेने निवडून दिले. सावरकरांवर ज्यांनी टीका केली त्या तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत करून मी खासदार झालो. सावरकरांनी जे देशहिताचे विचार दिले ते आता खर्‍या अर्थाने सत्यात उतरत आहेत. परंतु दुर्दैवाने सावरकरांवर ज्यांनी त्या काळी अन्याय केले तीच वैचारिक वृत्ती आजही सावरकरांच्या विचारांची पायमल्ली करीत आहे. 

अंदमानमध्ये ओळी पुन्हा लिहिल्या

खासदार बनसोडे म्हणाले, मणीशंकर अय्यर यांनी अंदमानमधील सावरकरांनी भिंतीवर लिहिलेल्या ओळी पुसल्या. परंतु आज सावरकरप्रेमी सरकारने त्या पुन्हा तेथे कोरीव स्वरूपात त्या ओळी बसविल्या आहेत. आज हे विचार पुढच्या पिढीसमोर जाणे आवश्यक आहे. त्यांना स्वातंत्र्य, त्यासाठी झालेला लढा याचे काही ज्ञान नाही. त्यांची वाचनाची इच्छाशक्‍ती नाही. त्यामुळे त्यांंना ते अंदमानला नेऊन दृष्यस्वरूपात दाखवायला हवे. सावरकरांचे विचार पुढे नेणारी साहित्य संमेलने वर्षांनुवर्षे व्हायला हवीत.

भाजपचे प्रदेश संघटक रघुनाथ कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर एकमेव असे नेते आहेत ज्यांना दोनवेळा जन्मठेप होऊनही त्यांनी स्वातंत्र्यलढा सुरू ठेवला. वर्णभेद निर्मूलन, विज्ञानवाद, विधवा पुनर्विवाहासह रोजगार निर्मितीबाबत  त्यांनी काम केले. आज तेच काम मोदी पुढे नेत आहेत. 

संमेलनाचा प्रारंभ सौ. धनश्री आपटे यांच्यासह कलाकारांनी ‘नमोस्तुते’ या सावरकरांच्या गीतावर सादर केलेल्या बहारदार नृत्याविष्काराने झाला. मकरंद देशपांडे यांनी स्वागत केले. प्रा. सचिन कानिटकर यांनी सूत्रसंचालन केले. संयोजन अ‍ॅड. बाळासाहेब देशपांडे, मुकुंद मोहिते, धनंजय पाठक आदींनी केले. यावेळी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, वा. ना. उत्पात,  माजी आमदार नितीन शिंदे, दीपक शिंदे, नगरसेविका आशा शिंदे, वैभव शिंदे आदी उपस्थित होते.

tags : modi government, nationalism, like savarkar, national modi, run government, Savarkars ideology, sangli news