Fri, Apr 26, 2019 17:22होमपेज › Sangli › मोबाईल चोरट्यांची टोळी गजाआड

मोबाईल चोरट्यांची टोळी गजाआड

Published On: Apr 12 2018 1:19AM | Last Updated: Apr 12 2018 12:28AMसांगली : प्रतिनिधी

रस्त्यावरून चालत किंवा दुचाकीवरून जाणार्‍यांचे मोबाईल हिसकावून पळून जाणार्‍या चोरट्यांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये पाच जणांचा समावेश असून त्यातील तीन तिघे जण अल्पवयीन आहेत.  चोरीचे मोबाईल विकत घेणार्‍या एका दुकानदारालाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 25 मोबाईल, दोन दुचाकी असा दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

अक्षय जयवंत निकम (वय 19, रा. लक्ष्मीनारायण कॉलनी), आकाश सदाशिव मोहिते (वय 19, रा. त्रिमूर्ती कॉलनी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर तीन अल्पवयीनांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मोबाईल दुकानाचा मालक जितेंद्र वसंत वाघमोडे (वय 40, रा. शंभर फुटी रोड, सांगली) यालाही अटक करण्यात आली आहे. या तिघाही संशयितांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

शहरातील मोबाईलवर बोलत, चालत जाणारे नागरिक, वृद्ध यांच्याकडील मोबाईल हिसकावून मोटारसायकलवरून पळून जात असल्याच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्‍त अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक अशोक वीरकर यांनी विश्रामबाग पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी चोरट्यांचा शोध घेत होते. अक्षय, आकाशसह तीन अल्पवयीन चोरटे असे गुन्हे करीत असल्याची माहिती निरीक्षक पोमण यांना खबर्‍याद्वारे मिळाली होती. 

त्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनी चोरलेले मोबाईल शंभर फुटी रोडवरील सिद्धीविनायक मोबाईल शॉपीचा मालक जितेंद्र वाघमोडे याला विकल्याचे सांगितले.  त्यालाही अटक करण्यात आली. सर्व संशयितांकडून आतापर्यंत 25 मोबाईल, एक मोपेड (एमएच 10 बीएफ 4339), एक मोटारसायकल (एमएच 10 सीएफ 3455) असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

निरीक्षक पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश पाटील, अमोल ढोले, ऋतुराज होळकर, रोहित माने, वसंत किर्वे, निवास माने, दीपक परीट, गणेश बिनवडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

Tags : Sangli, mobile thieves, gang arrested, sangli news,