Tue, Mar 19, 2019 15:55होमपेज › Sangli › सांगली : प्रभागनिहाय मतदारयाद्यात सावळागोंधळ

सांगली : प्रभागनिहाय मतदारयाद्यात सावळागोंधळ

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 08 2018 8:44PMसांगली ः प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीच्या प्रभागनिहाय प्रारूप याद्या नुकत्याच जाहीर झाल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी दुबार नावे आहेत. तर काही प्रभागात लोकसंख्येच्या तुलनेत दोन-अडीच हजाराने मतदार वाढले आहेत. एका प्रभागात लोकसंख्येच्या तुलनेत तब्बल 10 हजारांवर मतदार कमी आहेत. काही ठिकाणी तर एकेका प्रभागातील संपूर्ण भाग अन्य प्रभागात दाखविण्यात आले आहेत. एकूणच यामुळे याद्यांचे काम अनागोंदी पद्धतीने झाल्याच्या तक्रारी आहेत.

महापालिकेच्या पाचव्या  पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात आल्या. या याद्यांनुसार महापालिका क्षेत्रात 4 लाख 23 हजार 366 मतदार आहेत. त्यात पुरूष 2 लाख 15 हजार 89, तर महिला मतदार 2 लाख 8 हजार 240  आहेत. सदतीस मतदार हे इतर वर्गातील आहेत. सन 2013 मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या तुलनेत  30 हजार मतदारांची नव्याने भर पडली आहे. यामध्ये दि. 21 मे 2018 पर्यंत ज्या व्यक्तींनी मतदार नोंदणी केली आहे, त्यांची नावेही प्रारुप यादीत समाविष्ट करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जानेवारी ते 21 मे 2018 या पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल 18 हजार नव्या मतदारांची वाढ झाली आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्यात आले आहे. 

वास्तविक महापालिका प्रशासनाने पाठविलेल्या याद्यात दुबार नावे, प्रभागनिहाय मतदारांच्या संख्येत घोळ असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले होेते. त्यामुळे याद्या निश्‍चितीसाठी आयोगाने दोन दिवस वेळ घेतला. त्यानंतर गुरुवारी प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या. प्रशासनाने सकाळीच महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारुप मतदार यादी प्रसिध्द केली.  

जेव्हा इच्छुकांसह नागरिकांनी या याद्यांची खातरजमा सुरू केली, तेव्हा  या याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे दिसून आले. प्रत्येक मतदारसंघात लोकसंख्येच्या तुलनेत दोन-अडीच हजार मतदार वाढले आहेत अशा तक्रारी आहेत. 

काही प्रभागात 26 हजार, तर काही प्रभागात मतदारांची संख्या 16 हजारांच्या घरात आहे. इतकी तफावत कशी, असा जाब नगरसेवक, पदाधिकार्‍यांसह नागरिकांसह विचारला. यावर प्रभागाची रचना लोकसंख्येनुसार केली जाते. सन 2011 च्या लोकसंख्येचा विचार करून  प्रभाग रचना करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर गेल्या सात वषार्ंत प्रभागात लोकसंख्या व त्यापाठोपाठ मतदार संख्याही वाढली असणार, असा प्रशासनाने खुलासा केला आहे.

महापालिकेच्या दोन प्रभागात लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अधिक आहे. मिरजेतील प्रभाग 6 व सांगलीतील खणभागातील प्रभाग 16 मध्ये हा प्रकार निदर्शनास आला आहे. प्रभाग सहामध्ये 24 हजार 287 लोकसंख्या असताना मतदारसंख्या मात्र 24 हजार 649, तर प्रभाग 16 मध्ये लोकसंख्या 25 हजार 959 असताना 26 हजार 530 मतदार आहेत.  एकूणच प्रारूप मतदारयाद्यांत मोठा घोळ आहे. यावर आता हरकती-सुनावणीसाठी दि. 18 जूनपर्यंत मुदत आहे. त्यानंतर 30 जूनपर्यंत सुनावणी घेऊन याद्या अंतिम केल्या जाणार आहेत.

गोंधळ मान्य, हरकतीत दुरुस्त करू : उपायुक्‍त पवार

उपायुक्‍त सुनील पवार म्हणाले, सन2011 च्या लोकसंख्येनुसार प्रभागरचनेनुसार लोकसंख्येचे वर्गीकरण केले होते. मात्र  दि.21 मे 2018 पर्यंत नव्याने मतदार नोंदणीसह याद्या तयार केल्या आहेत. त्याचे प्रभागनिहाय विभाजन केल्यानंतर मतदारसंख्या वाढणार हे उघड आहे. पण यादी वर्गीकरण करताना काही ठिकाणी नावे दुबार आहेत. काही भागात इकडील नावे तिकडे झाली आहेत. त्याबाबत आता हरकती-सुनावणी होणार आहे. त्यामध्ये आलेल्या सर्वच तक्रारींचा उहापोह होईल. योग्य असलेल्या सर्व त्रुटी दूर होतील. प्रभागनिहाय मतदारसंख्या आणि त्यानुसार नि:पक्षपातीपणे मतदानप्रक्रिया होईल. 

शामरावनगरसह अनेक प्रभागात मतदार घटले कसे?
माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोडके म्हणाले, प्रारूप प्रभागरचना करताना जाहीर केलेली लोकसंख्या आणि आता जाहीर केलेल्या लोकसंख्येत फरक आहे. अन्य ठिकाणी नवे मतदार वाढल्याने मतदारसंख्या वाढली. मग सर्वात मोठा प्रभाग असलेल्या शामरावनगर, विजयनगरसह अन्य भागात  ते कसे घडले नाही? शामरावनगरात तर गेल्या 7-8 वर्षांत डझनावर वस्त्या नव्या वाढल्या आहेत. त्यामुळे तेथे 27 हजार 133 लोकसंख्या असताना मतदार मात्र 18 हजार 29 कसे? म्हणजे तेथे 9 हजार मतदार कमी कसे झाले?  विजयनगरच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये 24 हजार 276 लोकसंख्या आहे. मतदारांची संख्या मात्र 16 हजार 806 इतकी आहे. एकूणच या सर्व गोंधळामुळे महापालिका क्षेत्रात संशयकल्‍लोळ निर्माण झाला आहे.

प्रभाग यादीतही खणभागचे मतदार प्रभाग 10 मध्ये 
स्वाभिमानीचे  गटनेते जगन्नाथ ठोकळे म्हणाले, ज्याप्रमाणे मतदार याद्यांत घोळ आहे; तसाच प्रभाग याद्यात नकाशानुसार या प्रभागातून दुसर्‍या प्रभागात मतदान वळविण्याचा चमत्कार झाला आहे. खणभागातील नगारजी गल्‍ली, जमदाडे गल्‍ली, जगदाळे गल्‍ली, कलानगर, आरटीओ ऑफिस परिसरातील काही भागही प्रभाग 10 मध्ये समाविष्ट केला आहे. हा भाग त्या प्रभागाच्या रचनेत येत नाही. काँगे्रसचे गटनेते किशोर जामदार म्हणाले, मतदार याद्यांत काही ठिकाणी मतदार वाढविण्याचा ‘कार्यक्रम’ राबविण्यात आला आहे. यामागे षङ्यंत्र आहे का, असाही संशय आहे.  याबाबत योग्य ती खातरजमा झालीच पाहिजे.