Fri, Sep 21, 2018 11:25



होमपेज › Sangli › धागेदोरे हाती, दोन दिवसांत उलगडा

धागेदोरे हाती, दोन दिवसांत उलगडा

Published On: Jan 28 2018 1:33AM | Last Updated: Jan 27 2018 11:36PM



सांगली : प्रतिनिधी

गळवेवाडी (ता. आटपाडी) येथील प्रतीक्षा गळवेच्या खूनप्रकरणी ठोस धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकरणी दोन दिवसांत उलगडा होण्याची शक्यता असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या खूनप्रकरणाचा तपास अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

दि. 7 जानेवारी रोजी सायंकाळी गायब झालेल्या प्रतीक्षाचा दि. 8 रोजी सकाळी पडक्या विहिरीत मृतदेह सापडला होता. त्यानंतर नातेवाईकांनी तिच्यावर अत्याचार करून खून केल्याचा संशय पोलिसांकडे  व्यक्त केला होता. दरम्यान, अत्याचाराबाबतचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. मात्र, त्याबाबत गोपनियता पाळण्यात आली आहे. 

घटना उघडकीस आल्यापासून पोलिसांनी गळवेवाडी व काळेल वस्तीवर तपास सुरू ठेवला होता. स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक याचा तपास करीत होते. दरम्यान, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी नुकतीच गळवेवाडीला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या.  

संशयावरून काहीजणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र त्यांच्याकडे पोलिसी खाक्यानुसार चौकशी केली जात नव्हती. त्यामुळेच या गुन्ह्याचा तपास रेंगाळला होता. मात्र आता पोलिस ठोस निष्कर्षापर्यंत आले असून त्यांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागले आहेत. त्यामुळे दोन दिवसांत याप्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, काहीजणांवर पोलिसांना संशय असल्याने त्यांच्या शोधासाठी विविध भागात पोलिसांची पथके पाठविण्यात आली होती. डीएनए चाचणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवालही पोलिसांना प्राप्त झाला आहे.