Thu, Jul 18, 2019 00:50होमपेज › Sangli › मिरजेच्या युवकास जन्मठेप

मिरजेच्या युवकास जन्मठेप

Published On: Jan 23 2018 1:14AM | Last Updated: Jan 22 2018 11:45PMसांगली : प्रतिनिधी

मिरजेतील सह्याद्रीनगर येथील मैदानात किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून मित्राचाच खून केल्याप्रकरणी एका युवकास जन्मठेपेसह एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन देसाई यांनी सोमवारी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. 

सोहेल अब्बास मुल्ला (वय 23, रा. सोनवणे प्लॉट, मिरज) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. दि. 9 ऑगस्ट 2014 रोजी सोहेलने त्याचा मित्र बबलू ऊर्फ स्वप्निल दिलीप भोसले याचा खून केल्याचा आरोप होता. बबलू आणि सोहेल दोघेही चांगले मित्र होते. बबलूचा मित्र रोहित वायदंडे याच्याजवळ सोहेल बबलूबाबत काही तरी बोलला होता. त्याबाबत त्याने सोहेलकडे विचारणा केली होती. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला होता.  दि. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी सातच्या सुमारास मिरजेतील सह्याद्रीनगर येथील मैदानात बबलू आणि  सोहेल मित्रांसमवेत क्रिकेट खेळत होते. त्यावेळी त्या दोघांमध्ये  बाचाबाची झाली होती.     

त्यांचा मित्र अमित बराते त्यांच्यातील भांडणे सोडवत असताना सोहेलने खिशातील चाकू काढून बबलूच्या पोटात खुपसला. त्यानंतर तो तेथून पळून गेला.  मित्रांनी बबलूला मिरजेच्या शासकीय रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मिरज शहर पोलिस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्यानंतर सोहेलला तातडीने अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. यातील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपासी पोलिस अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. त्यांच्या साक्षी व  पुराव्याच्या आधारे न्या. देसाई यांनी सोहेलला जन्मठेप व एक हजार रूपयांचा दंड  आणि  दंड न दिल्यास एक महिन्यांचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.