Tue, Jun 18, 2019 22:21होमपेज › Sangli › मनपा क्षेत्रातील रस्त्यांची तपासणी होणार

मनपा क्षेत्रातील रस्त्यांची तपासणी होणार

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 23 2018 10:09PMमिरज : शहर प्रतिनिधी

सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रातील काही रस्त्यांचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. त्यांचा दर्जा कराड शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तपासणार आहे. त्यातूनही कारवाई न झाल्यास आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी माहिती  उपमहापौर विजय घाडगे, नगरसेवक शेखर माने, नगरसेविका अश्विनी कांबळे, प्रदीप कांबळे, विशालसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत
 दिली.

ते म्हणाले, मिरज शहरात 3 कोटी 39 लाख, सांगलीत 15 कोटी 8 लाख  आणि  कुपवाडमध्ये 4 कोटी 16 लाख रुपयांचे रस्ते झाले आहेत. या रस्त्यांच्या दर्जाविषयी नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या. मिरज येथील वंटमुरे कॉर्नर ते डॉ. आंबेडकर पुतळा ते हिरा हॉटेल या ‘एल टाईप’ रस्त्याची तपासणी केली. तेव्हा हा रस्ता व मिरज शहरातील इतर रस्ते दर्जाहीन केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे आयुक्तांकडे या रस्त्यांची तपासणी करण्याची मागणी केली  होती. 

त्याप्रमाणे मनपाचे अधिकारी, ठेकेदार व नागरिक यांच्यासमक्ष रस्त्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये रस्त्याची जाडी व वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रस्ते कामात मोठा घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शी दिसते आहे. 

यासंदर्भात आयुक्त रविंद्र खेबुडकर यांची भेट घेऊन मनपा क्षेत्रातील सर्वच रस्त्यांची कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.