Mon, Apr 22, 2019 01:59होमपेज › Sangli › मिरजेत मनपा निवडणुकीची जोरदार तयारी 

मिरजेत मनपा निवडणुकीची जोरदार तयारी 

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 9:07PMमिरज : जालिंदर हुलवान

महापालिका निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे.   प्रशासनही तयारीला लागले आहे. गेल्या वर्षभरापासून या निवणुकीची प्रतीक्षा अनेकांना होती.  त्यामुळे नव्या  इच्छुकांची संख्या भरपूर आहे. त्याशिवाय आजी- माजी नगरसेवक रिंगणात उतरणार आहेतच.  इच्छुक आता त्यांच्या संभाव्य प्रभागात दिसू लागले आहेत.  अनेकांना प्रभागांचा विकास करण्यासाठीची अत्यंत काळजी वाटू लागली आहे.  

महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये दिवंगत नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. त्यांची सत्ता महापालिकेत आली. त्यानंतर 2008 पर्यंत त्यांचेच महापालिकेवर पूर्ण वर्चस्व होते. त्यावेळी त्यांना मिरजेतील नेत्यांची साथ होती

सन 2008 च्या निवडणुकीपूर्वी मिरजेतील काही प्रमुख नेत्यांनी मदन पाटील यांची साथ सोडली आणि ते आमदार जयंत पाटील यांच्या गोटात दाखल झाले. मदन पाटील यांच्या सत्तेला सुरूंग हा मिरजेतूनच लागला होता. 

मदन पाटील यांच्या कारकीर्दीत येथे महापौर चषक फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी मिरजेतील काही नेत्यांनी  विरोध करून नाराजी व्यक्त केली होती. याच महापौर चषक फुटबॉल स्पर्धेतून वादाला सुरुवात झाली.  तो वाद  नंतर गणेश तलावातील गाळ काढण्याच्या मागणीच्या आंदोलनापर्यंत  पोहोचला. त्यानंतर खर्‍या अर्थाने (कै.) पाटील यांचा महापालिकेतील एकछत्री अंमल संपुष्टात आला. 

सन 2008 च्या निवडणुकीत  जयंत पाटील यांच्या विकास 

महाआघाडीला 36, काँग्रेसला 25, जनसुराज्यला 2 आणि अपक्षांना 11 जागा मिळाल्या.   सन 2013 च्या निवडणुकीत मिरजेत काँग्रेसने 27 तर राष्ट्रवादीने 26 प्रभागांमध्ये उमेदवार उभे केले होते. स्वाभिमानी आघाडीचे 15, शिवसेनेने 8 तर  मनसेने 7 ठिकाणी लढत दिली. 

त्या निवडणुकीत मिरजेत एकूण 13 प्रभाग होते. या 13 प्रभागांमधून 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी  14 नवे चेहरे  होते. आठ विद्यमान नगरसेवक निवडून आले होते. दहा आजी- माजी नगरसेवक, नगरसेविका पराभूत झाल्या होत्या. मिरजेत काँग्रेसला 15, राष्ट्रवादीला 8, स्वाभिमानी विकास आघाडीला 2, अपक्ष 1 आणि मनसेला एक जागा मिळाली. या निवडणुकीमध्ये  दोन प्रभाग एकत्र होणार आहेत. एकूण सात प्रभाग असतील. एका प्रभागात चार नगरसेवक असणार आहेत. 

 मात्र यंदाच्या निवडणुकीत काही समीकरणे बदलणार आहेत. सध्या महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. सन 2008 च्या निवडणुकीवेळी राज्यात आणि केंद्रात काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. आता मात्र केंद्रात आणि राज्यात भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना, जनसुराज्य शक्ती हे  पक्ष  मोठ्या ताकतीने या निवडणुकीत उतरणार आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाली तर काही समीकरणे बदलणार आहेत.

गेल्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. सन 2008 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारात होते. आता भाजप व सेनेचे मंत्री प्रचारात असणार आहेत. भाजपचे आमदार सुरेश खाडे यांनाही या निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्यावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे नेते (स्व.) आर. आर. पाटील, काँग्रेसचे नेते मदन पाटील यांची उणीव या निवडणुकीत त्या दोन्ही पक्षांना जाणवणार  आहे.