Sun, Jul 21, 2019 07:49होमपेज › Sangli › हमीभावाने तूर खरेदीची मर्यादा वाढविली

हमीभावाने तूर खरेदीची मर्यादा वाढविली

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 10:39PMसांगली : प्रतिनिधी

हमीभावाने तूर खरेदीची मर्यादा अखेर हेक्टरी 3.50 क्विंटलऐवजी 5 क्विंटल झाली आहे.  सोमवारी साडेतीन क्विंटलवरील परत पाठविलेली  1.20 लाख रुपयांची तूर खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात 
आली.

तुरीला क्विंटलला 5 हजार 450 रुपये हमीभाव आहे. मात्र बाजारात 4 हजार 100 रुपये दर आहे. तुरीचे दर घसरल्याने खरेदी केंद्र सुरू झाले आहे. नाफेडमार्फत सांगली मार्केट यार्डात सेंट्रल वेअर हाऊस येथे शुक्रवारी हमीभावाने तूर खरेदी केंद्र सुरू झाले आहे. 

नोंदणीवेळी हेक्टरी 5 क्विंटल तूर खरेदी केली जाणार असल्याचे शेतकर्‍यांना सांगण्यात आले होते. मात्र पीक कापणी प्रयोग अहवालानुसार सांगली जिल्ह्यात हेक्टरी 3.50 क्विंटल तूर खरेदी करण्याबाबत शासनाचे पत्र आले.  त्यामुळे काही शेतकर्‍यांना साडेतीन क्विंटलवरील तूर परत न्यावी लागली होती. खरेदी केंद्राच्या पहिल्याच दिवशी शेतकर्‍यांना मोठा मनस्ताप झाला होता. दै. ‘पुढारी’ने त्यावर प्रकाशझोत टाकला होता. 

सोमवारीही जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील शेतकर्‍यांची साडेतीन क्विंटलवरील तूर खरेदी केली नाही. जादाची 22 क्विंटल तूर घेऊन टेम्पो परत असताना त्यांना लगेचच परत बोलावून तूर खरेदी केली. शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून हेक्टरी 5 क्विंटलने खरेदीचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. 

हमीभावाने तूर खरेदीसाठी सहाशेहून अधिक शेतकर्‍यांनी नोंदणी केलेली आहे. दररोज वीस ते पंचवीस शेतकर्‍यांना खरेदी केंद्रावर तूर आणण्याचे मेसेज दिले जात आहेत.