Fri, Jul 19, 2019 20:51होमपेज › Sangli › दर कागदावर : दूधउत्पादक वार्‍यावर

दर कागदावर : दूधउत्पादक वार्‍यावर

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 8:43PMसांगली : विवेक दाभोळे

दूध दरवाढीच्या आंदोलनानंतर आता पुन्हा एकदा दूध उत्पादकांना मिळणारा दुधाचा दर आणि दुधाचा उत्पादन खर्च यांचे अर्थकारण चर्चेत आले आहे. भरमसाठ खर्च करुन देखील अपेक्षित दर मिळत नसल्याने दूध उत्पादकांसाठी दराची ‘कासंडी’ मात्र रिकामीच राहिली आहे.

नोव्हेंबर 2017 पासून दूधदराचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. डिसेंबर 2017 मध्ये राज्य शासनाने प्रतिलिटर दुधासाठी 27 रु. निश्‍चितीची घोषणा केली. मात्र  हा दर  बहुसंख्य दूधउत्पादकांना मिळालाच नाही.  

महिन्यांपूर्वी दूधदरवाढीसाठी मोठे आंदोलन झाले. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनेदेखील दुधाचा दर 25 रू. घोषित केला. मात्र यातून दुधाला खरोखरच दरवाढ मिळाली का, हा सवाल केला जातो आहे. खरे तर डिसेंबर 2017 मध्ये राज्य शासनाने दुधाला  27.00 रू. दर जाहीर केला होता.हा दर देणे विशेष अध्यादेश काढून बंधनकारक केले होते. पण त्याला बहुसंख्य दूधसंघ चालकांनी केराची टोपली दाखविली. 27 रुपयांचा दर दूधउत्पादकांना मिळालाच नाही. मात्र जूनमध्ये आंदोलन होऊन 35 रुपये दराची मागणी करण्यात आली. सरकारने 25 रुपयांचाच दर देण्याची तडजोड केली. प्रत्यक्षात शासनाने डिसेंबर 2017 मध्ये 27 रुपये दर जाहीर केला होता. तर आता 25 रू. दर मान्य केला. हा काय प्रकार आहे  तर आंदोलकांनी देखील गतवर्षीचा दर 27 रुपये असताना 25 रू. चा दर वाढीव दर म्हणून कसा मान्य केला, हा सवाल होतो आहेच.

खरे तर आता दुधाचा प्रतिलिटर उत्पादन खर्च वाढला आहे. पशुखाद्य, ओली सुकी वैरण महाग झाली आहे. जनावरांच्या किंमती तर आभाळाला भिडल्या आहेत. दूधउत्पादन तोट्याचेच ठरू लागले
आहे.

राज्य शासनाच्या दुग्ध विकास विभागाने म्हैस आणि गाय दूध यासाठीचा प्रतिलिटर उत्पादन खर्च अनुक्रमे 40 रू. आणि 28 रू. (3.50 फॅटसाठी) जाहीर केला आहे. पण तो मिळतो का, हा संशोधनाचाच विषय ठरावा.    

बर्‍याच वेळा दुधाचे उत्पादन जादा झाले म्हणून दर कमी केले जात असल्याचे कारण उत्पादकाला सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षातील चित्र वेगळेच दिसते. दुधापासून बनविण्यात येत असलेले दही, ताक, लोणी, तूप, पनीर, खवा या पदार्थांना बाजारात कायमच मोठी मागणी असते. यातून मोठा नफा संघचालकांना मिळतो, पण तो उत्पादकाला मात्र मिळत नाही, यातूनच उत्पादक नेहमीच आर्थिक कोंडीत आणि दूधव्यवसायिकांची पाचही बोटे मात्र तुपात असे चित्र आहे.

भरडला जातोय उत्पादक..

दूध संघचालक, खासगी व्यवसायिक दूध संकलन करताना दूध उत्पादकांकडून 6.5 फॅटचे म्हैस 38.90 रू. दराप्रमाणे खरेदी करतात. हेच दूध ग्राहकांना प्रतिलिटर 53.45 रुपयांना विकले जाते. गाय दूध देखील (4.2 फॅटचे) खरेदी होते 25.30 रुपयांना आणि त्याची ग्राहकांना विक्री होते 43 रू. प्रतिलिटर प्रमाणे! यातील तफावत तब्बल 17.70 रुपयांची राहते.

एक नजर दुग्धव्यवसायावर..

दूधसंघ संकलकांना खरेदीनंतर ते ग्राहकाला दूध विक्री करेपर्यंतचा खर्च पुढीलप्रमाणे : 

संस्था कमिशन - 1.20 रू., संकलन, शीतकरण - 4.80 रू., वाहतूक - 1.80 रू., वितरण वाहतूक - 4.65 रू. असा प्रतिलिटरसाठीचा हा खर्च 12.45 रू. होता. मात्र हाच खर्च चर्चेत आहे. दुधाला दर कमी का मिळतो याचे उत्तर या आकडेवारीतच लपले आहे. कर्ज काढून शेतकर्‍याने म्हैस, गाय दूध उत्पादन करायचे, मात्र दर कमी असल्याने त्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. तो कर्जबाजारी झाला आहे. दूध दराचा प्रश्‍न बाजूला ठेवला, तरीदेखील दुग्धपदार्थांचे उत्पादन आणि विक्रीतून दूधसंघचालक, खासगी व्यावसायिक डोळे विस्फारुन टाकणारा नफा कमावितात. मात्र या नफ्यातील मोठा हिस्सा दूधउत्पादकाच्या हक्काचा आहे, तो  दिला जात नाही, हा हिस्सा थोडाफार जरी दिला तरी दूधउत्पादकाला त्याचा दिलासा मिळू शकतो.