Mon, Apr 22, 2019 06:25होमपेज › Sangli › भेसळीच्या करामतींनी नासवून ठेवलंय दूध!

भेसळीच्या करामतींनी नासवून ठेवलंय दूध!

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 03 2017 11:36PM

बुकमार्क करा

सांगली : सुनील कदम

माणूस जन्माला आल्यानंतर त्याला या जगाच्या पाठीवरील कोणत्या खाद्य पदार्थाची ओळख होत असेल तर ती दुधाची. दुधाला आपल्या खाद्य संस्कृतीने अमृताचा दर्जा बहाल केला आहे, मात्र भेसळबाजीने सध्या दुधाला सफेद विषाच्या पंक्तीत नेवून बसविलेले आहे. दुधातील ही भेसळ आजकाल इतक्या पराकोटीला जावून पोहोचली आहे की एकेकाळी मानवी जीवनाला पोषक असलेले दूध आजकाल घातक बनत चालले आहे.

दुधाच्या सेवनाने व्यक्तीला वेगवेगळी प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कॅल्शियम, अनेक प्रकारची जीवनसत्व मिळतात. मात्र आजकालच्या दुधातून लोकांच्या शरीरात वेगवेगळी रसायने, डीटर्जंट पावडर, शँपू, सिंथेटीक पदार्थ असे बरेच काही जावून लोकांच्या आरोग्याला जीवघेणा धोका निर्माण झालेला आहे.

दुधातील भेसळीचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी त्यामध्ये पाणी मिसळणे, हा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून प्रामुख्याने घरोघरी दुधाचा रतीब घालणार्‍या गवळी महोदयांच्या मार्फत सुरू आहे. जरी ही भेसळच असली तरी ती नक्कीच जीवघेणी नाही. या प्रकारच्या भेसळीतून फार फार तर लोकांना कमी दर्जाचे आणि काही प्रमाणात कमी स्निग्धांश असलेले दूध मिळेल. शिवाय या प्रकारचे दूध थोडे जास्त वेळ तापविले की त्यात मिसळलेल्या पाण्याचे बाष्प होवून मूळ स्वरूपातील दूध मिळू शकते. मात्र दुधातील भेसळीचे दुसरे दोन प्रकार म्हणजे खरोखरच भयावह आणि लोकांसाठी प्राणघातक स्वरूपाचे आहेत.

दूध भेसळीतील दुसरा प्रकार म्हणजे शुध्द स्वरूपातील दुधातील स्निग्धांश काढून घेणे आणि नंतर त्यात वेगवेगळी रसायने मिसळणे. आपल्या राज्यात खासगी आणि सहकारी क्षेत्रातील लहान मोठे शेकडो दूध संघ आहेत. यापैकी काही सन्माननीय दूध संघांचा अपवाद वगळला तर बहुतेक सगळ्या दूध संघांमध्ये दुधातील स्निग्धांश काढून घेवून त्यात अन्य घटक मिसळण्याचे उद्योग चालतात. कदाचित लोकांचा विश्‍वास बसणार नाही, पण मिसळल्या जाणार्‍या घटकांमध्ये युरियासारखी रासायनिक खते, डिटर्जंट पावडर, कच्च्या स्वरूपातील डालडा, मैदा, साखर अशा पदार्थांचा समावेश आहे.

युरियासारक्या रासायनिक खताला ओला हात लावला तर काही वेळातच हाताला बारीक बारीक फोड येवून त्या भागाला खाज सुटते. मग हे रासायनिक खत दुधातून पोटात गेल्यानंतर आतड्यांची काय वाट लागत असेल त्याचा अंदाज येण्यास हरकत नाही. लहान मुलांना मातेच्या दुधा व्यतिरिक्त पुरक अन्न म्हणून बाहेरचे दूधच दिले जाते. आता हे असले युरियामिश्रित दूध पिवून बालकांच्या आणि सर्वसामान्यांच्या आरोग्याचे कसे धिंडवडे निघत असतील, याचा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. अशा प्रकारच्या भेसळीत कपडे धुण्याची डिटर्जंट पावडरली वापरली जाते. आता हे अशा लायकीचे दूध पिल्यानंतर माणसाच्या आतड्यांची काय दशा होत असेल, ते समजून येण्यास हरकत नाही.

दुधाच्या भेसळीतील तिसरा आणि सर्वाधिक भयावह प्रकार म्हणजे कृत्रिम दूध. मूळातच हे दूध कृत्रिम असल्यामुळे या प्रकाराला भेसळ तरी कशी म्हणायची, हासुध्दा एक प्रश्‍नच आहे. आजपर्यंत जगाच्या पाठीवरील कोणत्याही प्रयोगशाळेत कृत्रिम दूध तयार होवू शकलेले नाही. 

मात्र आपल्या देशातील महान भेसळ सम्राटांनी गेल्या पाच-पंचवीस वर्षापूर्वीच हा शोध लावून आपल्या ‘कर्तबगारीचे झेंडे’ फडकाविले आहेत. केस धुण्याचा शँपू, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे गोडेतेल किंवा डोक्याला लावायचे खोबरेल तेल, डिटर्जंट पावडर आणि अशाच स्वरूपाचे काही आचरट पदार्थ वापरून हे कृत्रिम दूध बनविले जाते. अशा स्वरूपाच्या दुधाला नैसर्गिक दुधाचा वास येण्यासाठी पुन्हा वेगवेगळ्या घातक रसायनांचा वापर करण्यात येतो. 

राज्यामध्ये वापरण्यात येत असलेल्या एकूण दुधापैकी जवळपास दहा टक्के दूध हे कृत्रिम असल्याचा अंदाज आहे. कृत्रिम दूध हा प्रामुख्याने उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये उगम पावून इथे राबविला जात असलेला प्रकार आहे.