Tue, Mar 19, 2019 03:57होमपेज › Sangli › ‘डीपीसी’ला २३ सदस्य ‘तयारी’ने जाणार

‘डीपीसी’ला २३ सदस्य ‘तयारी’ने जाणार

Published On: Dec 31 2017 1:28AM | Last Updated: Dec 30 2017 11:29PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक  सोमवारी (दि. 1 जानेवारी) होणार आहे. या बैठकीला जिल्हा परिषदेतून डीपीसीवर निवडून गेलेले 23 सदस्य ‘तयारीने अभ्यासून’ जाणार आहेत. ‘डीपीसी’वर जिल्हा परिषदेतून निवडून गेलेल्या सदस्यांना हक्काचा निधी मिळत नसल्याची भावना आहे. 

दरम्यान डीपीसीचा सन 2017-18 चा आराखडा कपातीमुळे 47 कोटी रुपयांनी कमी झाला आहे. सन 2018-19 साठी 212.64 कोटी व अतिरिक्त 65 कोटी असे एकूण 277 कोटींची मागणी शासनाकडे होईल. 
‘डीपीसी’च्या जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनांचा सन 2017-18 चा आराखडा 212 कोटी 65 लाखांचा होता. शासनाने वार्षिक योजनेतील निधीला 30 टक्के कपात लावली आहे. त्यानुसार 165 कोटी 44 लाखांची तरतूद शासनाने केली आहे. त्यापैकी 112.42 कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे. नोव्हेंबर 2017 अखेरचा खर्च 84 कोटी रुपये आहे. 

‘डीपीसी’वर जिल्हा परिषदेतून 23 सदस्य निवडून गेलेले आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक मार्चमध्ये झाली. मात्र ‘डीपीसी’च्या निवडणुकीस विलंब लागला. त्यामुळे सन 2017-18 चा आराखडा हे सदस्य ‘डीपीसी’वर निवडून जाण्यापूर्वी झाला. डीपीसीवर जिल्हा परिषदेतून निवडून गेलेल्या सदस्यांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांना हक्काचा निधी मिळत नाही. त्यांच्या निधीतील वाटा आमदार व निमंत्रित सदस्यांना दिला जातो, असा नाराजीचा सुर निवडून गेेलेल्या सदस्यांमध्ये आहे. जिल्हा परिषदेतून निवडून गेलेल्या सदस्यांना डावलले जाऊ नये यासाठी 23 सदस्य ‘तयारी’ने  जाणार आहेत. 

सन 2018-19 साठी विविध यंत्रणांकडून डीपीसीकडे 411 कोटी रुपयांची मागणी केलेली आहे. त्यापैकी 212.64 कोटी मान्य तरतूद आहे. याशिवाय डीपीसी अंतर्गत लहान गटाने 65 कोटी रुपयांची अतिरिक्त मागणीस मान्यता दिलेली आहे. हा एकूण 277 कोटींचा प्रस्तावित आराखडा ‘डीपीसी’ बैठकीपुढे चर्चेला येणार आहे. त्यानंतर राज्यस्तरावर अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. त्या बैठकीत डीपीसीचा सन 2018-19 च्या वार्षिक आराखडा अंतिम होईल.