होमपेज › Sangli › महापौरपदासाठी मोठी रस्सीखेच

महापौरपदासाठी मोठी रस्सीखेच

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 11 2018 1:22AMसांगली : प्रतिनिधी

महापालिकेत सत्तांतरानंतर भाजपतर्फे पहिला महापौर होणार आहे. हे पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे हा बहुमान मिळविण्यासाठी आठ जणी इच्छुक आहेत. त्यांनी नेत्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अर्थात, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय समीकरणे आणि तीनही शहरांना पदांमध्ये न्याय, या निकषांवर निर्णय घेतला जाणार आहे. 

त्यामुळेच महापौर, उपमहापौरपदाच्या उमेदवारीचा सोमवारी (दि. 13) कोअर कमिटी बैठकीत निर्णय होणार आहे. याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेही आता महापौरपदाची निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप आणि आघाडी यांच्यात संख्याबळाचे सहा ते सात एवढेच अंतर असल्याने चुरस वाढली आहे. 

महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावत भाजपने सत्तांतर घडविले.  42 जागांसह बहुमतासह महापालिकेत हा पक्ष सत्ताधारी पक्ष बनला आहे. आता भाजपचे पहिले महापौर आणि उपमहापौर निवडले जाणार आहेत. ही निवड दि. 20 ऑगस्टरोजी होणार आहे. यासाठी दि. 16 ऑगस्टरोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत.भाजपतर्फे या पदासाठी आठजणी इच्छुक आहेत. या पदासाठी भाजपमधून मूळ निष्ठावंतांना संधी द्यावी असा सूर आहे. दुसरीकडे भाजपचा कारभार गतीमान व पारदर्शी होण्यासाठी अनुभवी नगरसेविकेला संधी मिळावी, असेही मत व्यक्त होते आहे. यासंदर्भात कोअर कमिटीध्येही चर्चा झाल्याचे समजते.  

आतापर्यंतचा  अनुभव पाहता भाजप नेते निष्ठावंतांना संधी देतात असे दिसून येते. त्यामुळे आता  पक्षनेते कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. महापालिकेबाबत योग्य निर्णय घेण्याचे भाजप कोअर कमिटीसमोर आव्हान आहे. 

सविता मदने, कल्पना कोळेकर, गीता सुतार, उर्मिला बेलवलकर, अस्मिता सरगर या प्रथमच निवडून आलेल्या नगरसेविका महापौरपदासाठी  इच्छुक आहेत. दुसरीकडे नुकताच प्रवेश करून भाजपला यश मिळवून देणार्‍या सौ. संगीता खोत, अनारकली कुरणे यांच्यासारख्या अनुभवी नगरसेविकाही स्पर्धेत आहेत. शामरावनगराने भाजपला साथ दिली. त्यामुळे नसिमा नाईक  यांना संधी द्यावी  अशीही मागणी आहे. अर्थात भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान पटकाविण्यासाठी मोठी रस्सीखेच सुरू आहे. 

आगामी लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक यांचा विचार करून प्रामुख्याने सांगलीला महापौरपदाची संधी द्यावी, असा सूर आहे. तसे झाल्यास सविता मदने, गीता सुतार व उर्मिला बेलवलकर, अनारकली कुरणे यापैकी एकीला संधी मिळू शकते. पण अनुभवाचा निकष असेल तर  सौ. खोत यांना संधी मिळू शकते. याचा फैसला कोअर कमिटी करणार आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीही महापौर निवडणुकीसाठी मैदानात उतरणार आहे. त्यांनी बिनविरोध निवडणूक होऊ द्यायची नाही, असे ठरवले आहे. त्यामुळे काँग्रेसला  महापौरपद आणि  राष्ट्रवादीला उपमहापौरपदाची  निवडणूक लढवण्याची संधी देण्यात येईल. महापौरपदासाठी आरती वळवडे, मदिना बारुदवाले, वहिदा नायकवडी यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. आघाडीचे संख्याबळ 35  आहे. स्वाभिमानीचे विजय घाडगे त्यांच्यासोबत आहेत.

विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी गटनेतेपदाचीही चुरस

विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसमध्ये  रस्सीखेच सुरू आहे.  उत्तम साखळकर, संजय मेंढे, उमेश पाटील, वहिदा नायकवडी यांच्याबरोबर प्रभाग 15 मध्ये पूर्ण पॅनेलला विजय मिळवून देणारे  मंगेश चव्हाणही इच्छुक आहेत. या निवडीसह  महापौर, उपमहापौर उमेदवार ठरविण्यासाठी आघाडीची दि.14 ऑगस्टला बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या गटनेतेपदासाठी शेडजी मोहिते, विष्णू माने, मैनुद्दीन बागवान इच्छुक आहेत. याबाबत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील 13 ऑगस्ट रोजी फैसला करणार आहेत.

उपमहापौरपद, गटनेते, ‘स्थायी’साठी रस्सीखेच

महापौरपदाबरोबरच अन्य पदांसाठीही भाजपकडून सांगली, मिरज आणि कुपवाडचा समतोल साधला जाईल. सांगलीला  महापौरपदाची संधी दिल्यास मिरजेला स्थायी समिती सभापतिपद दिले जाईल. त्या पदासाठी पांडुरंग कोरे, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने, गणेश माळी, गायत्री कुल्‍लोळी, मोहना ठाणेदार यांची नावे चर्चेत आहेत. गटनेतेपदासाठी भारती दिगडे, युवराज बावडेकर ,लक्ष्मण नवलाई, पांडुरंग कोरे यांचीही नावे चर्चेत आहेत. उपमहापौरपद कुपवाडला द्यावयाचे झाल्यास प्रकाश ढंग, राजेंद्र कुंभार आदींची नावे चर्चेत आहेत.