Fri, Apr 26, 2019 00:08होमपेज › Sangli › महापौरांसह अधिकारी बनले गायक....

महापौरांसह अधिकारी बनले गायक....

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 9:16PMसांगली : प्रतिनिधी

महापौर हारुण शिकलगार, उपायुक्‍त सुनील पाटील, स्मृती पाटील यांच्यासह अधिकारी हातात माईक घेऊन चक्क गायक बनले. निमित्त होते महापालिकेच्या 20 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित अधिकारी, पदाधिकारी, कर्मचार्‍यांच्या गुणदर्शनपर ऑर्केस्ट्राचे. या कार्यक्रमात कर्मचारी, अधिकारी बेधुंद होऊन नाचले. स्वच्छता मोहीम, विविध उपक्रमांनी वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
‘चढता सूरज धिरे धिरे ढल जायेगा’ या कव्वालीसह ‘प्यार दोनो ने किया’ हे गाणे सादर करत शिकलगार यांनी महापालिकेच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी उपायुक्त सुनील पवार यांनी ‘मै शायर तो नही’ तर उपायुक्त स्मृती पाटील यांनी सादर केलेल्या ‘कभी अलविदा ना कहना’ गीतांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

मुख्य कार्यालयात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून स्थायी समिती सभागृहात केक कापला. एकमेकांना केक भरवून मतभेदांवर पडदा टाकला. उपमहापौर विजय घाटगे, स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, नगरसेवक शेखर माने, युवराज गायकवाड, उपायुक्त पवार, स्मृती पाटील, स्वाभिमानीचे गटनेते जगन्नाथ ठोकळे, नगरसेवक संतोष पाटील, बाळासाहेब काकडे, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर, कामगार अधिकारी चंद्रकांत आडके, नगरसेवक युवराज गायकवाड, राजू गवळी आदी उपस्थित होते. वसंतदादा पाटील सभागृहात कोल्हापूरचे  हास्यकलाकार एन. अशोक यांनी विनोदी एकपात्री कार्यक्रम सादर केला. शिकलगार व खेबुडकर यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. उपायुक्त पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभाग वाढण्याचे अवाहन केले. यासाठी प्रभाग स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे खेबुडकर यांनी सांगितले.