होमपेज › Sangli › कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांचा अपमान

कर्जमाफीच्या नावाखाली शेतकर्‍यांचा अपमान

Published On: Dec 30 2017 12:44AM | Last Updated: Dec 29 2017 8:57PM

बुकमार्क करा
मांगले : वार्ताहर

विकासकामांच्या नावाने नुसत्या घोषणा करणारे  हे सरकार असून कर्जमाफीच्या योजनेत दररोज नवा फतवा काढून सरकार कष्टकरी आणि संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांचा अपमान करत असल्याची घणाघाती टीका   माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.

मांगले (ता. शिराळा) येथे बाळासो दशवंत विकास सोसायटीच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी मानसिंगराव नाईक बोलत होते.  राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील  प्रमुख उपस्थित होते.   

यावेळी बोलताना नाईक म्हणाले, राजेंद्र दशवंत यांनी बाळासो दशवंत सोसायटीच्या प्रगतीत मोठे योगदान दिले आहे. सोसायटीच्या शेतकरी सभासदांच्या उन्नतीसाठी त्यांनी चांगले कार्य केले आहे. गावपातळीवरील विकास सोसायटी या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मांगले गावच्या विकासासाठी आणि विकासकामाची गती वाढविण्यासाठी नूतन  पदाधिकार्‍यांनी प्रगतशील राहण्याचे त्यांनी आवाहन केले. 

कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील म्हणाले, काटकसरीने व योग्य नियोजनाने कारभार असेल तर संस्थेची प्रगती होते. सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र दशवंत म्हणाले, (कै.) बाळासो दशवंत, (कै.) डॉ. महादेव दशवंत, (कै.) सर्जेराव दशवंत यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या या विकास सोसायटीच्या रोपट्याच्या प्रगतीला आपण अध्यक्ष झाल्यापासून गती दिली आहे. स्वभांडवलावर इमारतीची उभारणी केली आहे. 

डॉ. उषाताई दशवंत, डॉ. सतीश पाटील, दत्ता पाटील, धनंजय माने यांचे भाषण झाले. जि. प. सदस्या वैशाली नाईक, डॉ. श्रध्दा चरापले, शहाजी गायकवाड, सुरेश पाटील, दत्ता पाटील, माणिक दशवंत आदी उपस्थित होते.  रामराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी सभासद, शेतकरी, विविध क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.