Sun, Jan 20, 2019 20:30होमपेज › Sangli › थायलंड : गुहेतील मुलांच्या मदतीला धावला ‘सह्याद्री’

थायलंड : गुहेतील मुलांच्या मदतीला धावला ‘सह्याद्री’

Published On: Jul 11 2018 9:59AM | Last Updated: Jul 11 2018 9:56AMसांगली : पुढारी ऑनलाईन

थायलंडमधील थाम लुआंग गुहेत अडकलेल्या मुलांची तब्बल १५ दिवसानंतर सुखरुप सुटका करण्यात बचावपथकाला यश आले. पावसाच्या पाण्यामुळे गुहेतील बाहेर येण्याचे मार्ग बंद झाल्याने २३ जून रोजी गुहेत गेलेली प्रशिक्षकासह १३ मुलांची फुटबॉल टीम गुहेत अडकली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मदत केली गेली. यात महाराष्ट्रातील अभियंत्यानेही महत्त्वाची भूमिका पार पाडली. गुहेतील पाणी उपसण्यासाठी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीने तयार केलेल्या फ्लड पंपाचा वापर करण्यात आला. त्यासाठी कंपनीचे मीरज येथील अभियंता प्रसाद कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने काम केले.  यामुळे मुलांना गुहेतून लवकर बाहेर काढण्यात यश आले. 

गुहेतील मुलांच्या बचावकार्यात पावसामुळे अडथळा निर्माण झाला होता. पावसाचा जोर वाढल्याने गुहेतील पाणी पातळीत वाढ होत होती. यामुळे मुलांना बाहेर काढण्यासाठी कदाचित ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत वाट पहावी लागली असती. मात्र पाणी उपसण्यासाठी फ्लड पंपांचा वापर केल्याने बचावकार्य वेगाने करता आले. यासाठी थायलंड सरकारने भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लडपंप्स पाठवण्यास सांगीतले होते. त्यावर भारत सरकार व किर्लोस्कर कंपनीने युद्ध पातळीवर हालचाल करून डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने (शुक्रवार दि. ०६)  थायलंडला रवाना केली होती.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथील अभियंता प्रसाद कुलकणी हे फ्लड पंप्स तंज्ञनातील तज्ञ आणि कुशल अभियंता आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते किर्लोस्कर कंपनीत काम करत आहेत. थायलंडमध्ये आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर करत प्रसाद कुलकर्णी यांनी गुहेतील पाणी पातळी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे १२ मुलांची प्रशिक्षकासह सुखरुप सुटका झाली.