Tue, Jul 23, 2019 06:23होमपेज › Sangli › महामस्तकाभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात

महामस्तकाभिषेकाची तयारी अंतिम टप्प्यात

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:14PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

श्री क्षेत्र श्रवणबेळगोळ येथे 7 फेब्रुवारीपासून श्री भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 25 फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव चालणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू असून ती अंतिम टप्प्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महोत्सव समितीचे सचिव सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महोत्सवासाठी जगभरातून 80 लाख भाविक येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, प.पू. 108 आचार्य श्री वर्धमानसागर महाराज यांच्या सानिध्यात व प. पू. स्वस्तिश्री जगदगुरू चारूकीर्ती भट्टारक स्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव होणार आहे. विंध्यगिरी पहाडावरील या सोहळ्यासाठी जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून चार मजली पहाड उभारण्यात आला आहे. यामध्ये येण्या-जाण्यासाठी दोन लिफ्ट व अभिषेक सामग्रीसाठी स्वतंत्र लिफ्टची सोय करण्यात आली आहे. 

या महोत्सवासाठी येणार्‍या भाविकांना राहण्यासाठी 11 नगरांची रचना करण्यात आली आहे. शौचालयांनीयुक्त असे पाच हजार कॉटेज उभारण्यात आले आहेत. महोत्सव काळात रोज तीन लाखांहून अधिक भाविकांच्या भोजनासाठी 17 भोजनशाळा उभारण्यात आल्या आहेत. विविध राज्यांच्या स्वादानुसार भोजन, नाष्ट्याची सोय करण्यात आली आहे. भोजनाची व्यवस्था निःशुल्क असणार आहे. यासाठी देशभरातून हजारो टन भोजन सामग्री भाविकांकडून दान दिली जात आहे. 

या महामस्तकाभिषेकासाठी तीन आचार्य, चारशेहून अधिक  मुनी, हजारो त्यागीगण सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र त्यागीनगर उभारण्यात आले आहे. मुनीश्री, साध्वींसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आले आहेत. विंध्यगिरी, चंद्रगिरी पहाडावरील सुविधांचे काम पूर्णत्वास आले आहे. या सोहळ्यासाठी चारशे एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही निमंत्रण देण्यात आले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.  यावेळी अभय पाटील, सुभाष देसाई उपस्थित होते. 

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, उभारणार
महामस्तकाभिषेक सोहळा झाल्यानंतर दानशूरांच्या देणगीतून श्रवणबेळगोळ येथे सर्व सुविधांनी युक्त असे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी पन्नास कोटींची तरतूद समितीतर्फे करण्यात आली आहे. सुमारे दोनशे खाटांचे हे हॉस्पिटल असणार आहे. वीस एकरांमध्ये त्याची उभारणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय प्राकृत विश्‍व विद्यालयाचीही उभारणी करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत देण्याची ग्वाही दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.