होमपेज › Sangli › ‘अनुसूचित जातीतल्या मोठ्या वर्गाचे शोषण’(व्हिडिओ)

‘अनुसूचित जातीतल्या मोठ्या वर्गाचे शोषण’(व्हिडिओ) 

Published On: Dec 03 2017 12:50PM | Last Updated: Dec 03 2017 12:50PM

बुकमार्क करा

विटा : विजय लाळे

‘‘हजारो वर्षे उपेक्षित राहिलेल्या देशातील अनुसूचित जातीतील अनेक समाजांना सामाजिक न्याय आणि समता आजवर कोणत्याही सत्ताधाऱ्यांकडून मिळाली नाही. प्रत्येक राज्यात केवळ ठराविक समाजालाच सर्व काही मिळालेले आहे. उरलेल्या मोठ्या वर्गाचे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक शोषण सुरु आहे. असा घणाघाती आरोप लोकशाहीर अण्णा भाऊ साठे  स्मारक समितीचे विद्यमान सचिव आणि महात्मा फुले महामंडळाचे माजी अध्यक्ष नामदार मधुकर कांबळे यांनी केला. 

कांबळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ‘‘२६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशात साजरा होतो. संविधान दिन म्हटल्यावर त्या अनुशंघाने संविधानावर चर्चा अपेक्षित आहे. या संविधानाचा आत्मा सामाजिक न्याय आणि समता आहे. अनेक वर्षे जो समाज उपेक्षित राहिला, अनेक वर्षे ज्या समाजाचे शोषण झाले, त्या समाजाला सामाजिक न्याय देण्याबाबत अनेक प्रकारच्या गोष्टी या संविधानात आहेत. देशात समान संधी आणि समता प्रत्येक गोष्टीत मिळाली पाहिजे. पण देशातल्या प्रत्येक राज्यात केवळ ठराविक समाजालाच सर्व काही मिळालेले आहे. उरलेल्या मोठ्या वर्गाचे आजही राजकीय, आर्थिक आणि सामाजिक शोषण सुरु आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि आंध्र प्रदेशमध्ये काय चाललेले आहे? अनुसूचित जातीतील कोणत्या तरी एका घटकाला सर्व काही मिळाले. उरलेल्यांचे काय ? त्यांना जे संविधानाने जे अधिकार दिले आहेत. ते त्यांना मिळालेले नाहीत. सामाजिक न्यायाचे आणि समतेची अंमलबजावणी करताना सर्व लहान लहान समाजाला आधारभूत धरणे गरजेचे होते. तसे न होता काही ठराविक समाजालाच सर्व काही मिळाले, तो समाज वरती गेला. दुर्दैवाने उरलेल्यांना काहीही मिळाले नाही. मी मुख्यमंत्र्यांना तेच सांगितले. त्यातूनच  अण्णा  भाऊ साठेंच्या स्मारकाचा विषय पुढे आला. लोकशाहिरांनी समाजातील उपेक्षित घटकांना आपल्या साहित्यातून हिरो केले. परंतु, सध्या जे सुरु आहे. त्याची खंत सर्व काही लोक बोलतात काही बोलत नाहीत. पण आता बोलण्याची वेळ आली आहे. या अगोदरच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले. काही ठराविक लोकच म्हणजे दलित आहेत त्यांसाठी केले म्हणजेच सर्व झाले ही भावना झाल्यामुळे बाकीच्यांचे काय? मागासवर्गीय इतर समाजांची काय अवस्था आहे. ओबीसी मधल्या सुद्धा कुंभार, लोहार, सुतार, नाभिक, धोबी यांची काय अवस्था आहे? त्यांची कोण चर्चा करत आहे? असा प्रश्न कांबळे यांनी यावेळी विचारला. 

ते म्‍हणाले, ‘‘अनुसूचित जातीमधल्या मातंग, चर्मकार, खाटीक, होलार यांची काय अवस्था आहे? असे अनेक समाज आहेत. जातीय वाद दूर करायचा आहे. असे आपण म्हणतो पण या छोट्या छोट्या समाजाचे काय? संधी जेंव्हा मिळते तेंव्हा जे बुद्धीमान असतात त्यांनाच शैक्षणिक संधी मिळणार असा आरोपही होऊ शकतो. परंतु, ज्या योजना पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या आहेत त्या तरी या समाजापर्यंत पोहोचतात का हे पाहिले पाहिजे का नको?’’

 

व्हिडिओ: विजय लाळे