Thu, Apr 25, 2019 23:27होमपेज › Sangli › लुटारूंची टोळी रंगेहाथ जेरबंद

लुटारूंची टोळी रंगेहाथ जेरबंद

Published On: Jun 09 2018 1:36AM | Last Updated: Jun 08 2018 11:35PMमिरज : शहर प्रतिनिधी

तालुक्यातील भोसे गावच्या हद्दीमध्ये ट्रकवर चढून चालकाला लुटताना सहा जणांच्या टोळीला मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मोहन जाधव यांनी रंगेहाथ पकडले. 

रोहित राजाराम कार्वेकर (वय 24), रमजान महंमद गडकरी (वय 20, दोघे रा. दानोळी, ता. शिरोळ), महेश ऊर्फ पिल्या आनंद पारचे (वय 19, रा. सूतगिरणी चौक, कुपवाड), सिद्धांत सुनील शिंदे (वय 20, रा. यशवंतनगर, कुपवाड), अमोल अर्जुन जानकर (वय 18, रा. कुपवाड), विनायक रामा पाटील, (वय 21, कापसे प्लॉट, कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही  माहिती पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी शुक्रवारी येथे पत्रकार बैठकीत दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे उपस्थित होते.

ते म्हणाले, शुक्रवारी मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय जाधव हे मालट्रक घेऊन रत्नागिरीहून सोलापूरकडे निघाले होते. सहा जणांच्या टोळीने तो ट्रक दुचाकी आडवी उभी करून अडविला.

चालक व क्‍लीनर या दोघांना मारहाण करून त्यांच्याकडून मोबाईल व 19 हजार रुपयांची रोकड लंपास केली. त्यानंतर चोरटे पंढरपूरच्या दिशेने निघून गेले. 

त्यानंतर ट्रकचालकाने पोलिस निरीक्षक  जाधव यांना ही माहिती दिली. त्यांनी हवालदार चंद्रकांत वाघ व दरोडा पथकाच्या साहाय्याने पंढरपूर रस्त्याच्या दिशेने शोध घेतला. भोसे गावाच्या हद्दीमध्ये सहा जणांची टोळी आणखी एका ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्याकडून पैसे काढून घेत होती. 

पोलिसांच्या पथकाने त्यापैकी रोहित कार्वेकर व रमजान गडकरी या दोघांना पकडले. अन्य चौघेजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. त्यानंतर निरीक्षक जाधव यांनी पळून गेलेल्या महेश पारचे, सिद्धांत शिंदे, अमोल जानकर, विनायक पाटील यांनाही पकडले. त्यांची झडती घेतल्यानंतर मिरजेत ट्रक चालकाकडून लुटलेले पैसे व मोबाईल सापडला. त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करून  अटक करण्यात आली आहे.