Tue, May 21, 2019 12:32होमपेज › Sangli › जिल्ह्यात मटक्याला मिळतोय ‘राजाश्रय’!

जिल्ह्यात मटक्याला मिळतोय ‘राजाश्रय’!

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 05 2018 8:41PMसांगली : अभिजित बसुगडे

पोलिसांनी कितीही दावा केला तरी जिल्ह्यात मटका जोमात सुरू असल्याचे चित्र आहे. राजकीय गॉडफादरच्या जीवावर अनेक पक्षातील दोन नंबरच्या फळीतील कार्यकर्त्यांनी मटक्यात चांगलाच जम बसवल्याचे चित्र आहे. मटक्याच्या आयत्या पैशाच्या उबीतूनच जिल्ह्यात ‘दादागिरी’ करण्याचे प्रकार वाढत आहेत. यातूनच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न सातत्याने निर्माण होत आहे. राजाश्रयातूनच मटका बहरल्याचे एकूणच चित्र आहे. 

गतवर्षी तत्कालीन पोलिस अधीक्षकांनी जिल्ह्यातील मटका बुकींच्या सुमारे 22 टोळ्यांतील दीडशेहून अधिकजणांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. त्यातही पळवाट शोधून अनेकांनी या हद्दपारीला तात्पुरती स्थगिती मिळविली. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनीही कार्यभार घेतल्यापासून मटका बुकींवर हद्दपारीची कारवाई सुरूच आहे.  उघड्यावर मटका सुरू नसला तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही कोट्यवधींची उलाढाल होत आहे. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाकडून सातत्याने मटका बुकींवर होणार्‍या कारवायातूनच जिल्ह्यात मटका सुरू असल्यावर शिक्कामोर्तब होत आहे. हद्दपारी झाल्यानंतरही बुकींनी गॉडफादरच्या ‘तात्या’मार्फत पंटरमार्फत धंदा पुन्हा सुरू केल्याचे चित्र आहे. त्यातच पुन्हा पोलिसांचा ससेमीरा मागे लागू नये यासाठी मटका बुकी राजकीय गॉडफादरच्या आश्रयाखाली गेल्याचे चित्र आहे. 

या गॉडफादरने आपला सरदार ‘तात्या’कडे संपूर्ण जिल्ह्याचा ‘कारभार’ सोपविला आहे. त्यातूनच ‘तात्या’ जिल्ह्यातील सर्वच मटका बुकींचा मसिहा असल्याच्या थाटात वावरत आहे. स्वतःचा धंदा नसतानाही त्याची लाखोंची कमाई होत आहे. यातूनच त्याच्यासारख्या अनेक राजकीय लाभार्थ्यांना आयते पैसे मिळत असल्याने त्याची चांगलीच उब त्यांच्या अंगात उतरल्याचे दिसत आहे. राजाश्रयासोबतच अनेक ठिकाणी पोलिसांचाही याला पाठिंबा आहे का, अशी शंका घेण्यासही वाव आहे. अधीक्षक शर्मा यांनी कडक कारवाईचे आदेश, इशारे दिले तरी मटक्याला काहींचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा आहे. अंतर्गत संघर्षातूनही अशा मटका बुकींसह ‘तात्या’सारख्यांना हाताशी धरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम केले जात आहे. 

जिल्ह्यात वाढलेले खुनी हल्ले, मारामार्‍या यालाही काही प्रमाणात मटका जबाबदार असल्याची चर्चा आहे. डोक्यावर गॉडफादरचा हात आणि खिशात  मटक्याचा आयता पैसा यामुळेच या गुन्हेगारी कारवायांत वाढ झाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे गुन्हेगारी आणि मटक्याच्या पैशातून आलेली मुजोरी मोडून काढण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मात्र प्रामाणिकपणे राजकीय दबाव झुगारून बेसिक पोलिसिंग केल्यास मटका जिल्ह्यातून हद्दपार होण्यात कोणतीच अडचण नाही. 

Tags : Sangli ,illegal, Matka, spread, Sangli district, People, raised, question, against, Police department, take, action, against