Thu, Jul 18, 2019 17:00होमपेज › Sangli › जिवंत रुग्णालाच केले मृत घोषित

जिवंत रुग्णालाच केले मृत घोषित

Published On: Jun 20 2018 1:39AM | Last Updated: Jun 20 2018 1:39AMसांगली : प्रतिनिधी

येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेला रुग्ण जिवंत असताना तो मृत झाल्याचे हॉस्पिटलतर्फे नातेवाईकांना सोमवारी मध्यरात्री कळवण्यात आले. त्यानंतर घाई-गडबडीत दुसराच मृतदेह त्यांना दाखवून त्याची उत्तरीय तपासणीही करण्यात आली. नंतर मृत्यूचे प्रमाणपत्र देऊन मृतदेहही नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

गावी गेल्यानंतर हा मृतदेह आपल्या नातेवाईकाचा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी सिव्हील प्रशासनाला धारेवर धरले. सायंकाळी मृतदेह ताब्यात घेऊन सिव्हील प्रशासनाने यावर पडदा टाकला. 

तासगाव येथील अविनाश उर्फ चिलू दादोबा बागवडे (वय 58) यांना दहा दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सिव्हीलमधील वॉर्ड क्रमांक 63 मध्ये दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती अचानक खराब झाल्याने त्यांना संसर्गजन्य रूग्ण कक्षेत हलविण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास सिव्हील प्रशासनाने नातेवाईकांना फोनवरून बागवडे यांचा मृत्यू झाल्याचे कळविले. तसेच उत्तरीय तपासणी करायची असल्याने ताबडतोब येण्याचा निरोपही यावेळी देण्यात आला. 

त्यानंतर पहाटे बागवडे यांचे बंधू रविंद्र आणि पुतण्या अमित यांच्यासह काही नातेवाईक सिव्हीलमध्ये आले. त्यांना थेट उत्तरीय तपासणी कक्षातच नेण्यात आले. तेथे घाई गडबडीत मृतदेह दाखवण्यात आला. तसेच फोटोही काढून घेण्यास सांगण्यात आले. 

मृतदेह पाहिल्यानंतर अमित यांना मृतदेहाबाबत शंका आली. त्यांनी ती सिव्हीलच्या डॉक्टरना बोलूनही दाखवली; मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत उत्तरीय तपासणी करून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. 

यावेळी नातेवाईकांच्या सह्याही घेण्यात आल्या. तसेच यकृत खराब झाल्याने मृत्यू झाल्याचे कारण असलेले प्रमाणपत्रही त्यांना देण्यात आले. नंतर नातेवाईक मंगळवारी सकाळी मृतदेह घेऊन तासगावला गेले. तेथे मृतदेह पाहिल्यानंतर तो अविनाश बागवडे यांचा नसल्याचे स्पष्ट झाले.  दुपारी साडेतीनच्या सुमारास सर्व नातेवाईक तो मृतदेह घेऊन सिव्हीलकडे आले. तेथे त्यांनी अविनाश ज्या कक्षात दाखल आहेत तेथे धाव घेतली. त्यावेळी ते जिवंत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मात्र नातेवाईकांनी सिव्हील प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्यावेळी प्रशासनाने त्यांना दिलेला मृतदेह दुसर्‍याचाच असल्याची कबुली देत घडलेल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली. रात्री सातच्या सुमारास प्रशासनाने तो मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर बागवडे यांचे नातेवाईक निघून गेले. 

तासगाव पोलिसांची तारांबळ

बागवडे यांना सिव्हीलमध्ये दाखल करताना एमएलसी (मेडिका लिगल केस) अंतर्गत दाखल करून घेण्यात आले होते. याबाबत तासगाव पोलिस ठाण्यातही नोंद करण्यात आली होती. बागवडे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केल्यानंतर तासगाव पोलिस ठाण्यातही कळविण्यात आले होते. त्यांचा एक पोलिस सकाळपासून सिव्हीलमध्ये हजर होता. त्यांनी इन्क्वेस्ट पंचनामा केल्यानंतरच उत्तरीय तपासणी करण्यात आली होती. मृतदेह बदलाचा गोंधळ झाल्याने सायंकाळी तासगावचे पोलिस निरीक्षक श्री. सिंदकर यांनीही सिव्हीलकडे धाव घेतली. सिव्हील प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर रात्री तासगाव पोलिस परतले. या घटनेमुळे तासगाव पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. 

48 तासांत दोषींवर कारवाई करू : डॉ. उगाणे

संसर्गजन्य कक्षात दाखल असलेल्या रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याची कागदपत्रे कोणी बनवली. नातेवाईकांना चुकीचा निरोप कोणी दिला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 48 तासांत चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे. या चौकशीचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी यांनाही पाठविण्यात येणार आहे. यासाठी डॉ. उगाणे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. प्रकाश धुमाळ, डॉ. बरदाळे, अधिसेविका सीमा चव्हाण यांची समिती नियुक्‍त करण्यात आली आहे. यातील दोषींवर कडक कारवाई करू, असे सिव्हिल वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे यांनी पत्रकारांना दिली.