Sat, Jul 20, 2019 15:04होमपेज › Sangli › एकवीस हजार शेतकर्‍यांच्या पात्र-अपात्रतेकडे लक्ष

एकवीस हजार शेतकर्‍यांच्या पात्र-अपात्रतेकडे लक्ष

Published On: Feb 07 2018 1:36AM | Last Updated: Feb 06 2018 10:36PMसांगली  ; प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत ‘मिसमॅच-2’ यादीतील 20 हजार 842 शेतकर्‍यांच्या पात्र-अपात्रतेकडे लक्ष लागले आहे. विकास सोसायटी व बँक स्तरावर माहितीची छाननी व लेखापरीक्षकांकडून पडताळणी झाल्यानंतर या शेतकर्‍यांची माहिती तालुकास्तरीय समितीकडे अंतिम निर्णयासाठी जाणार आहे.   कर्जमाफी योजनेसाठी शेतकर्‍यांनी ऑनलाईन भरलेली माहिती आणि विकास सोसायटी, बँकेकडून सादर झालेली माहिती याचा राज्यस्तरावर ताळमेळ न लागलेल्या (मिसमॅच-1) यादीतील 57 हजार शेतकर्‍यांची माहिती शासनाकडून आली होती. यापैकी 48 हजार शेतकर्‍यांच्या माहितीची छाननी झाली आहे. 39 हजार पात्र, तर 9 हजार शेतकरी अपात्र ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्रुटींच्या यादीतील 19 हजार 463 शेतकरी अपात्र ठरले होते. जिल्ह्यात एकूण 58 हजार शेतकरी अपात्र ठरलेले आहेत. तर 91 हजार शेतकर्‍यांना 187 कोटींचा लाभ झालेला आहे. 

दरम्यान 20 हजार 842 शेतकर्‍यांची ‘मिसमॅच-2’ यादी शासनाकडून सोमवारी आली आहे. या यादीतील माहितीची विकास सोसायटी व बँकस्तरावर छाननी  सुरू झाली आहे.  संबंधित शेतकर्‍यांनी पूरक माहिती सादर करायची आहे. ‘मिसमॅच-2’ यादीतील माहितीची छाननी झाल्यानंतर लेखापरीक्षकांकडून पडताळणी व त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून पात्र-अपात्रतेवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. ‘मिसमॅच-2’ यादीत किती शेतकरी पात्र, किती अपात्र ठरणार याकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरूवारी (दि. 8) व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेणार आहेत. जिल्हा उपनिबंधक, बँकांचे प्रतिनिधी यांच्याकडून आढावा घेतला जाणार आहे.