होमपेज › Sangli › महावितरणा अजब कारभार; शुन्य रूपये बिलालाही दहा रूपये दंड

महावितरणा अजब कारभार; शुन्य रूपये बिलालाही दहा रूपये दंड

Published On: Jun 03 2018 5:31PM | Last Updated: Jun 03 2018 5:36PMसांगली : पुढारी ऑनलाईन

महाराष्‍ट्रात वीज पुरवठा करणार्‍या महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारावरून अनेकदा संतप्‍त प्रतिक्रिया उमटत असतात. परंतु, आता तर कंपनीच्या या कारभाराबाबत एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्‍हायरल झाला आहे. सांगलीतील एका ग्राहकाने ९९ युनिट वीज वापरली आणि त्याला बिल आले चक्‍क शुन्य रुपये. परंतु, कहर म्‍हणजे हे शुन्य रुपये बिल वेळेत भरले नाही म्‍हणून ग्राहकाला १० रुपये दंड करण्यात आला आहे. 

पुढारी ऑनलाईनने मीरज तालुक्यातील हरीपूरच्या राहुल महावीर वरड यांच्याशी संपर्क साधून याप्रकरणी माहिती घेतली. महावितरणचे हे बिल पाहून आपणही अचंबित झालो. चौकशीसाठी वायरमनशी संपर्क साधला असता त्यांनी येऊन मीटर तपासला. परंतु, हे बिल बरोबर असून आपली अगोदरची रक्‍कम शिल्‍लक असल्याने आपल्याला शुन्य रुपये बिल आल्याचे त्यांनी सांगितले, असे वरड म्‍हणाले. 

►वीजबिलाचा शॉक; भाजी विक्रेत्याची आत्महत्या

गेल्या ८ वर्षांपासून वीज वापरत आहे. शिल्‍लक रक्‍कम कोणती हे मलाही समजले नाही. बिल शुन्य आले असले तरी महावितरणने १० रुपये दंडाची आकारणी केली आहे. शुन्य रुपये बिल कसे भरायचे आणि त्यावर १० रुपयांचा दंड कसा? हे प्रकरण आपल्यालाही कळाले नसल्याचे वरड यांनी सांगितले. 

काहीही असो परंतु महावितरणाचा अनागोंदी कारभार सोशल मीडियावर चांगलाच व्‍हायरल झाला आहे. भारनियमन, वीज पुरवठ्यातील समस्या आणि भ्रष्‍टाचार यांमुळे वीज ग्राहकांत पूर्वीच नाराजी आहे. त्यात अशा अनागोंदी कारभाराचा फटकाही ग्राहकांनाच बसतो. 

असेच सातार्‍यात गेल्या १० वर्षांपूर्वी मुजवलेल्या विहिरीवर कोणतीही पाण्याची मोटार नसताना, विहिरी जवळ कोणतेही वीज कनेक्शन नसताना, मीटर नसताना महावितरणने त्या ग्राहकास २० हजार ४७० रुपयांचे बिल आकारल्याचा प्रताप पुढे आला होता. तसेच औरंगाबादमध्ये एका भाजी विक्रेत्याच्या पत्र्याच्या दोन खोल्यांच्या घराला ८ लाख ७५ हजार ८३० रुपयांचे वीज बिल आले होते. या बिलाला घाबरूनच त्यांनी आत्‍महत्या केल्याचे कुटुंबीयांनी म्‍हटले होते.