Fri, Apr 26, 2019 19:39होमपेज › Sangli › वीज दरवाढीविरोधात मुंबईत उद्या मोर्चा

वीज दरवाढीविरोधात मुंबईत उद्या मोर्चा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुंडल/कसबे डिग्रज: वार्ताहर

कृषिपंपाच्या वीजदरवाढी विरोधात  मंगळवार, दि. 27 रोजी मुंबईत  प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा आयोजित केला आहे, अशी  माहिती इरिगेशन फेडरेशनचे कार्याध्यक्ष जे. पी. लाड यांनी  दिली. कृषिपंपाची अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी, कृषीपंपास दिवसा 12 तास वीजपुरवठा करावा, वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करावी, कृषिपंपाचे अन्यायी भारनियमन रद्द करावे, प्रस्तावित 20 टक्के सरकारी पाणीपट्टी दरवाढ  रद्द करावी, कृषिपंपाची जलमापक यंत्र (मीटर) बसवू नये, राज्यातील सर्व कृषिपंप वीजग्राहकांचे माफक सवलतीचे वीजदर पुन्हा कायम ठेवावेत,  सहकारी पाणीपुरवठा संस्थांना प्रतियुनिट रूपये 1.16 पैसे हा दर पुढील तीन वर्षे कायम ठेवावा, पश्‍चिम महाराष्ट्रातील पेड पेंडिंग कनेक्शन ताबडतोब द्यावीत, थकबाकी मुद्दलामध्ये 50 टक्के सवलत देवून कृषीसंजीवनी योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांसाठी विधानभवनवर मोर्चा काढण्यात येणार आहे. 

याबाबत कुंडल येथे बैठक घेण्यात आली. या वेळी  क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण  लाड, अशोक पवार, भीमराव  कदम,  प्रकाश पाटील, हणमंत लाड, अजित कुलकर्णी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  

मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथेही बैठक घेण्यात आली. बैठकीत शेतकर्‍यांसमोर बोलताना प्रतापराव होगाडे म्हणाले, सिंचन योजनांच्या वीज बिलात जवळपास तिप्पट दरवाढ झाली. जानेवारी 2016 मध्ये  झालेल्या आंदोलनात वीज बिलाची होळी करण्यात सध्याचे मुख्यमंत्री होते. मात्र आता ते विसरले. त्यांचे सरकार आल्यावर त्यांना अनेकवेळा भेटलो. नाही म्हणत नाहीत, मात्र करत  काहीच नाही. सरकारने दिलेली सबसिडी महावितरणन घेतली आहे,  याचा हिशोब केला तर शेतकरी महावितरणला एकही पैसा देणे लागत नाही. कृषी पंपाची बोगस बिलाचा उद्योग गेली चार वर्षे सुरू आहे.  बोगस बिल असल्याचा अहवालावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र आजअखेर अहवाल सादर झाला नाही. यातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येतील. 

शेतकर्‍यांना शंभर युनिट ऐवजी साठ युनिट वीज दिली जाते. शेतकर्‍यांची सबसिडी लाटली जाते. उलट शेतकर्‍यांनाच बदनाम केले जाते. दुप्पट वीज वापर दाखवून चोरी खपवली जाते. भ्रष्ट अधिकार्‍यांना  पोसण्यासाठीच हा धंदा सुरू आहे.  वीज बिल घेटाळा हे  ऊर्जामंत्री मान्य करतात आणि शेतकर्‍यांची थकबाकी खोटी असताना ती भरण्याचे आदेश देतात, असेही ते म्हणाले. 

बाळासाहेब मासुले, आनंदराव नलवडे, गायकवाड गुरूजी, सुनील फराटे, आप्पा जाधव व शेतकरी उपस्थित होते.


  •