Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Sangli › डॉ. कदम मुख्यमंत्री झाले नाहीत याची जिल्ह्याला खंत

डॉ. कदम मुख्यमंत्री झाले नाहीत याची जिल्ह्याला खंत

Published On: Mar 17 2018 1:13AM | Last Updated: Mar 16 2018 9:20PMसांगली : प्रतिनिधी

माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम हेे धडाडीचे नेते होते. त्यांनी शुन्यातून विश्‍व निर्माण केले. ते मुख्यमंत्री झाले नाहीत याची खंत जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला आहे. धडाडीच्या नेत्याला महाराष्ट्र आणि सांगली जिल्हा मुकला आहे, अशी श्रद्धांजली जिल्हा परिषदेत शोकसभेत वाहण्यात आली. 

सभापती अरूण राजमाने, तम्मनगौडा रवि, ब्रह्मदेव पडळकर,  जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजयकुमार माने तसेच सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख म्हणाले, डॉ. कदम यांचे राजकारण, समाजकारण मी जवळून पाहिलेे आहे. मतदारसंघात आमच्यात विकासाचा संघर्ष होता. संस्था, कारखाने उभा राहिले.  विकासाला गती मिळाली. ते मुख्यमंत्री होणे अपेक्षित होते. पण ते होऊ शकले नाहीत याची खंत जिल्ह्याला आहे. 

उपाध्यक्ष सुहास बाबर म्हणाले, डॉ. कदम यांचे शिक्षण, आरोग्य, सामाजिक क्षेत्रातील काम उत्तुंग आहे. राजकारणात सर्वच कामे संघर्षातून होत नसतात. शांत बसून गोड बोलूनही काम करता येते, याची शिकवण डॉ. कदम यांनी दिली. 

सभापती प्रा. डॉ. सुषमा नायकवडी म्हणाल्या, डॉ. कदम यांचा हुतात्मा संकुलाला मोठा आधार होता. त्यांचे जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत म्हणाले, डॉ. कदम यांनी मंत्रीमंडळात विविध खात्यांचा कारभार अतिशय चांगल्याप्रकारे सांभाळला. कमी वेळेत धडाडीने निर्णय घेणे हे त्यांचे कसब मोठे होते. 

सत्यजित देशमुख म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील त्यांची कामगिरी  उत्तुंग आहे. ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांबरोबरच जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात त्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली आहे. यावेळी सदस्य डी. के. पाटील, अर्जुन पाटील, संभाजी कचरे, महादेव दुधाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ  व सदस्य, अधिकार्‍यांनी डॉ. कदम यांना आदरांजली 
वाहिली.