Sun, Jul 21, 2019 10:27होमपेज › Sangli › धनगर समाजाचा अखेरचा इशारा

धनगर समाजाचा अखेरचा इशारा

Published On: Aug 14 2018 1:06AM | Last Updated: Aug 13 2018 8:15PMसांगली : प्रतिनिधी

धनगर समाजाला घटनेने आरक्षण दिलेले असताना भाजप सरकार  चार वर्षांपासून समाजाची फसवणूक करीत आहे. एक महिन्यात आरक्षण न दिल्यास समाज रस्त्यावर उतरून आक्रोश आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात या मागणीसाठी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे धरण्यात आले. 

राज्यातील धनगर समाजास अनुसूचित जमातीच्या सवलती द्याव्यात, या मागणीसाठी समस्त धनगर समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. ठिकठिकाणाहून कार्यकर्ते मोटासायकल रॅलीने आले. येळकोट, येळकोट जय मल्हार...च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला.  कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देत आरक्षणाची मागणी केली. 

माजी मंत्री डांगे म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न गेल्या 60 वर्षांपासून प्रलंबित आहे. फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर तातडीने आरक्षण देण्याचे कबूल केले होते. परंतु गेली चार वर्षे सरकार केवळ आश्‍वासनेच देत आहे. आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी नोव्हेंबरमध्ये आरक्षण देण्याची घोषणा केलेली आहे. वास्तविक पाहता डिसेंबरमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची  शक्यता आहे. या काळात जर लोकसभा बरखास्त झाली तर आरक्षण मिळणारच नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थिती आरक्षण हे एका महिन्याच्या आतच मिळाले पाहिजे. टाटा इन्स्टिट्यूटचा अहवाल येणार असल्याचे सांगून वेळ मारून नेली जात आहे. त्यामुळे घटनेनेच आम्हाला आरक्षण दिलेले असल्यामुळे पुन्हा अहवालाची गरज नाही. आहे त्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने केली पाहिजे.

प्रकाश शेंडगे म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. सरकारने आश्‍वासन देऊनही गेल्या चार वर्षांत पूर्तता केलेली नाही. त्यामुळे धनगर समाजाचा संयम सुटत आहे. सरकारने आता समाजाचा  अंत पाहू नये. त्यांनी धनगर समाजाच्या फसवणुकीचा उद्योग बंद करावा. यापुढे रस्त्यावरची लढाई आम्ही लढणार आहोत. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ही सरकारवर राहील. 

यावेळी धनगर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर. एस. चोपडे, नगरसेवक विष्णू माने, सांगली कृषि  उत्पन्न  बाजार समितीचे संचालक बाळासाहेब बंडगर, माजी सभापती आकाराम मासाळ, नगरसेवक मनोज सरगर, मनगु सरगर, माजी नगरसेवक सुभाष गोयकर, प्रकाश ढंग, सुनील मलगुंडे, संगीता खोत, कुंडलिक एडके, शिवाजीराव एडके, शर्मिला पाटील, उमा वाघमोडे, तानाजी व्हनमाने उपस्थित होते.  यावेळी काँग्रेस नेत्या  जयश्रीताई पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला.

8 सप्टेंबरला चौंडी येथून रणशिंग फुंकणार

माजी आ. प्रकाश शेंडगे म्हणाले, धनगर समाज आता आरक्षणासाठी अखेरची रस्त्यावरची लढाई लढणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले आहे. 24 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढण्यात येतील. सरकारने या मोर्चाची दखल घेतली नाही, तर 8 सप्टेंबरला चौंडी येथून अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापासून भंडारा कपाळी लावून संपूर्ण समाज रस्त्यावर उतरून आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहे, असा इशारा यावेळी देण्यात आला.