Sat, Mar 23, 2019 02:28होमपेज › Sangli › आघाडीचा घोळ मिटेना; भाजपचे ‘वेट अँड वॉच’

आघाडीचा घोळ मिटेना; भाजपचे ‘वेट अँड वॉच’

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 11:51PMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचे अखेरचे दोन दिवस उरले आहेत. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटप आणि आघाडीबाबतचा घोळ काही मिटेना. सोमवारी यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. दुसरीकडे भाजप नेत्यांनीही सकाळपासून सायंकाळपर्यंत एकीकडे यादी फायनलसाठी चर्चा सुरू होती. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीतील विद्यमान आजी-माजी नगरसेवक आणि काही बड्या कार्यकर्त्यांना वळवण्याचे  प्रयत्न सुरू ठेवले होते. 

अर्ज भरण्याची मुदत दोन दिवस राहिली आहे. त्यामुळे इच्छुकांची ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तारांबळ सुरू होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने खबरदारी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत याद्या निश्‍चिती लांबवली. तसेच एबी फॉर्म शेवटच्या दिवशी (बुधवारी) देण्याचा निर्णय घेतला; परंतु आघाडीचा फैसला आणि दोन्ही काँग्रेसच्या याद्या होत नाहीत, तोपयर्र्ंत भाजपनेही ‘वेट अँड वॉच’ची भूमिका ठेवली होती.
शिवसेनेनेही अशाच पद्धतीने नाराजांवर ‘वॉच’ ठेवला आहे. जिल्हा सुधार समितीच्या उमेदवारांसह काही जणांनी मात्र आज ऑनलाईन व प्रत्यक्षही अर्ज भरले.

महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच गती आली आहे. अर्ज भरण्यासाठी बुधवारी दुपारपर्यंत तीन वाजेपर्यंतची मुदत आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादीने या निवडणुकीत भाजपविरोधात 
आघाडी करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेले आघाडीच्या चर्चेचे घोडे शेवटचे दोन दिवस उरले असले तरी पुढे सरकले नव्हते. आजही पुन्हा राष्ट्रवादीने 35 जागांसाठी आग्रह कायम ठेवला होता.  आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज, गटनेते किशोर जामदार यांची सोमवारी पहाटे पाचपर्यंत बैठक चालली. यामध्ये प्रभागनिहाय दोन्ही पक्षांच्या उमेदवार छाननी आणि जागा ‘अ‍ॅडजेस्ट’ करण्यावर चर्चा झाली. पण शेवटपर्यंत  तोडगा निघाला नाही.

काँगे्रेसने मात्र राष्ट्रवादीला 30 जागांवर एकही जागा देणार नाही असा पवित्रा घेतला आहे. आज सायंकाळी 5 वाजल्यापासून जयंत पाटील, पृथ्वीराज पाटील, संजय बजाज, किशोर जामदार माजी महापौर सुरेश पाटील यांच्या उपस्थितीत पुन्हा जागावाटपाची चर्चा सुरू होती. काँग्रेसने एखाद दुसरी जागा वाढवून देऊ असा पवित्रा घेतला होता.रात्री  पुन्हा काँगे्रेसनेत्या जयश्री पाटील यांच्या उपस्थितीत  बैठक सुरू होती. पण शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही. 

भाजपनेही सोमवारी दुपारपर्यंत 70 टक्के उमेदवार जाहीर करण्याची केलेली घोषणा आज प्रत्यक्षात आली नाही. खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सरचिटणीस मकरंद देशपांडे, माजी आमदार दिनकर पाटील, शेखर इनामदार, नीता केळकर, दीपक शिंदे  यांच्या उपस्थितीत प्रभागनिहाय याद्यानिश्‍चितीची चर्चा सुरू होती. परंतु सांगलीतील गावभाग, विश्रामबाग, गव्हर्मेंट कॉलनीसह काही जागांवर इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवार निश्‍चितीचा घोळ सुरू होता. सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही बैठक सुरूच होती. 

काँग्रेस-राष्ट्रवादीतील काही आजी-माजी नगरसेवक, प्रबळ कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांनाही भाजपच्या नेत्यांनी फोन केले.उमेदवारी निश्‍चितीच्या हमीसह अर्ज भरण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतून नाराजांवर वॉच ठेवून भाजपनेही यादी मंगळवारी सायंकाळपर्यंत लांबविण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणीच अंतिम यादी निश्‍चित करून एबी फॉर्म देण्याचा निर्णय घेतला.शिवसेनेनेही आयारामांवर वॉच ठेवत यादी निश्‍चित केली नव्हती. दुसरीकडे सेनेतील संभाजी पवार गटाने तर थेट सवतासुभा मांडत काही इच्छुकांचे स्वाभिमानी विकास आघाडीच्यावतीने प्रभाग 14 मधून ऑनलाईन अर्ज भरले.  सोबतच एकीकडे शिवसेनेच्या यादीतही सहभाग दाखविला होता. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतही पवार गटाची पॅनेलसाठी चर्चा सुरू होती.  यामुळे समर्थक व इच्छुकांत संभ्रमाचे वातावरण होते.

जिल्हा सुधार समितीनेही सर्व उमेदवारांचे प्रत्यक्ष अर्ज दिले नव्हते. एकूणच सर्वच पक्षांच्या उमेदवारीचा सोमवारीही गोंधळ कायम होता. परंतु ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागत असल्याने सर्वच पक्षांनी अडथळा नको यासाठी सर्वच इच्छुकांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या. यामुळे तीनही शहरात ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती. 

अर्ज एका पक्षाचे; चर्चा दुसर्‍या पक्षाकडे

काही पक्षांनी आयारामांसाठी दारे खुली ठेवली आहेत. त्यामुळे कोणाला कोणत्या पक्षातून संधी मिळणार याबाबत संभ्रमआहे. इच्छुकांनीही याची खबरदारी घेत ज्या-त्या पक्षांकडून अर्ज दाखल केले. सोबतच अन्य पक्षांकडून बोलावणे आल्याने त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवली होती. प्रसंगी त्या पक्षाकडून उमेदवारी सोईस्कर ठरली, तर पुन्हा त्यासाठी अर्ज भरण्याची तयारी ठेवली. एकूणच यामुळे काही पक्षांना उमेदवारी ठरविण्याबरोबरच आपल्या पक्षातून दुसरीकडे जाणार्‍या इच्छुकांना थोपविण्याची दुहेरी कसरत करावी लागत होती.