होमपेज › Sangli › क्रांतिवीरांचे स्मारक अखेरच्या टप्प्यात

क्रांतिवीरांचे स्मारक अखेरच्या टप्प्यात

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 20 2017 10:10PM

बुकमार्क करा

वाळवा : प्रतिनिधी

येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या स्मारकाला राज्य शासनाने  16 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यामुळे लवकरच हे स्मारक पूर्ण होईल, अशी माहिती हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी दिली. 

येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या प्रारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. चंद्रकांत पाटील,  ना. सुभाष देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी 16 कोटी रुपये मंजूर केल्याचे जाहीर केले. वैभव नायकवडी यांनी सातत्याने या स्मारकाच्या अखेरच्या टप्प्यासाठी निधी मंजूर व्हावा म्हणून प्रयत्न केले. त्यामुळेच हा निधी मंजूर झाला आहे. 

दि.15 ऑगस्ट 2014 रोजी या स्मारकाच्या कामाचा प्रारंभ तत्कालीन पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. सुरुवातीच्या टप्प्यात राज्य सरकारने या कामासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर केले होते. हुतात्मा संकुलाने हे काम गतीने पूर्ण केले. त्यानंतर उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता होती. त्याप्रमाणे नवीन सरकार आल्यानंतर वैभव नायकवडी यांनी निधी मिळावा, म्हणून पाठपुरावा केला. त्यामुळेच उर्वरित कामासाठी 16 कोटी रुपये मंजूर झाले. 

वाळवा, पडवळवाडी रस्त्याला हुतात्मा कारखान्याशेजारी या स्मारकासाठी 3 एकर जागा कारखान्याने दिली आहे. या जागेमध्ये हे स्मारक उभे राहिले आहे. या स्मारकामध्ये भव्य मिटिंग हॉल, मिनी थिएटर, देशभरातून सहकाराच्या अभ्यासासाठी व क्रांतिकाळातील अभ्यासासाठी येणार्‍या अभ्यासकांची राहण्याची सोय, ग्रंथालय, स्टडी रूम आदी सुसज्ज सोयी करण्यात येणार आहेत. तसेच अभ्यासकांना माहिती मिळावी यासाठी सर्व सुविधा निर्माण केल्या जात आहेत. शेजारीच क्रांतिवीर नागनाथअण्णांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. उपलब्ध जागेत बगीचा, उद्यान केले जाणार आहे. 

तसेच देशभरातील सहकारी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी येणार्‍या अभ्यासकांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. त्याकरिता शासनाकडे मंत्रालयात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. लवकरच तोही मंजुरीच्या प्रक्रियेत  आहे. 

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिलेला स्वातंत्र्यलढा देशभर प्रसिद्ध आहे. पुढील पिढ्यांना तो माहीत व्हावा त्यादृष्टीने या स्मारकामधून प्रबोधन  आणि प्रयत्न होणार आहेत. 

स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांनी इंग्रजांच्याविरोधात दिलेला लढा तसेच त्या काळातील विविध चळवळी यांचे संशोधन व्हावे या मुख्य उद्देशातूनच हे स्मारक उभे राहत असून ते राष्ट्रीय स्मारक बनावे यासाठी हुतात्मा संकुल प्रयत्नशील असल्याचे वैभव नायकवडी यांनी सांगितले.