होमपेज › Sangli › मिरजेत अळ्यामिश्रित पाणीपुरवठा

मिरजेत अळ्यामिश्रित पाणीपुरवठा

Published On: May 13 2018 2:17AM | Last Updated: May 12 2018 8:34PMमिरज : प्रतिनिधी

शहरात गेल्या काही दिवसांपासून अपुरा, अनियमित तसेच दूषित पाणी पुरवठा होत आहे. याबाबत महापालिका पाणीपुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रारी करुनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे त्यांच्या निषेधार्थ आमरण उपोषण करण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.

शहरात सुरू असलेले अमृत योजनेचे काम सध्या बंद आहे. लक्ष्मी मार्केट परिसर, ब्राम्हणपुरी, टाकळी रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होतो. पाण्यात भरपूर अळ्या फिरत असतात. पिण्याच्या पाण्याला सांडपाण्याचाही वास येतो. याबाबत परिसरातील ज्ञानेश्‍वर पोतदार, अरशद मोमीन, सुभाष महामुनी, महंमद मोमीन, गौस अत्तार, रमीजाबी पठाण यांनी पाणी पुरवठा अभियंता वाय.एस.जाधव यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. परंतु त्यांनी कोणताही  कारवाई केली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

तसेच या कार्यालयाकडील कर्मचार्‍यांकडूनही नागरिकांना ‘दूषित पाणी येणारच, कोठे तक्रार करायची असेल तेथे करा’, असे म्हणून प्रश्‍न सोडविण्याऐवजी दुरुत्तरे दिली जातात. आयुक्त व अन्य अधिकार्‍यांनी केलेल्या सूचनांनाही पाणी पुरवठा अभियंता जाधव हे जुमानत नाहीत, अशाही नागरिकांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात नागरिकांनी उपोषणाचा  इशारा  दिला आहे. चार वर्षांपूर्वी मिरज शहरात गॅस्ट्रोने चौदा लोकांचा बळी गेला होता. दूषित पाण्याचे आणखी बळी महापालिकेला हवे आहेत का, असा प्रश्‍न या नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात विचारला आहे.