Tue, Jul 16, 2019 01:46होमपेज › Sangli › तोडणी मजूर न आल्याने ऊस तोडी मंद

तोडणी मजूर न आल्याने ऊस तोडी मंद

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 8:35PM

बुकमार्क करा

कडेगाव  ः संदीप पाटील 

गेल्या महिन्यात जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांच्या गळीत हंगामास  धडाक्यात सुरुवात झाली. परंतु बहुसंख्य कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या न आल्याने वाहन मालकांना कोट्यवधींचा गंडा बसला आहे. तसेच तोडणी हंगामही मंद गतीने सुरू आहे. 

दरवर्षी जिल्ह्यात पुसद, बीड, उस्मानबाद व कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणावर ऊस तोडणी मजूर येतात. त्यांना कारखान्यांच्या माध्यमातून वाहन मालकांव्दारे करार करून एका टोळीला (15ते 20) मजुरांना सुमारे पाच ते सहा लाख रुपये  दिले जातात. हे सर्व पैसे या मजुरांना तोडणी मुकादमाच्या माध्यमातूनच दिले जातात. 

मजूर आणण्याची व त्यांच्याकडून तोडणी करून घेण्याची पूर्णपणे जबाबदारी कारखानदार  व  मुकादम यांची आहे. पण फसवणुकीच्या वाढत्या प्रकारामुळे कारखानदारांनी गेल्या पाच -सहा वर्षांपासून यातून हात झटकले आहेत. त्यामुळे वाहन मालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. बहुसंख्य वाहन मालकांनी जमीन, घर यावर कर्ज काढून ट्रॅक्टर, ट्रक खरेदी केली आहेत. 

चार ते पाच महिन्याच्या होणार्‍या ऊस धंद्यातून वाहनांचे हप्ते भरण्याचा प्रयत्न वाहनधारकांकडून केला जातो. परंतु  यावर्षी तोडणी मजूर न आल्याने धंदा कसा करायचा व बँकेचे कर्ज व हप्ते भागवायचे कसे, हा मोठा प्रश्‍न सध्या वाहनधारकांसमोर उभा  आहे. तोडणी मजुरांअभावी व टोळ्याच न आल्याने कारखान्यांच्या शेती विभागाला ऊस तोडणी कार्यक्रम आखणे मोठे अवघड होऊन बसले आहे.

गेल्या काही दिवसांपासून आडसाली उसाची तोडणी कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे ऊस वेळेवर कारखान्याकडे जाणार कसा, या चिंतेत सध्या शेतकरी असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे कारखानदार व सहकार विभागाने तोडणी मुकादम व मजुरांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.