होमपेज › Sangli › कुपवाडमध्ये महिलेचा निर्घृण खून

कुपवाडमध्ये महिलेचा निर्घृण खून

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 11 2018 10:38PM

बुकमार्क करा
कुपवाड : वार्ताहर

येथील उल्हासनगरमधील श्रीमती इंदुबाई शिवाजी माने (वय 52) या महिलेचा खून झाल्याचे गुरुवारी निष्पन्‍न झाले. याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील माधवनगर रस्त्यालगत असलेल्या एका पतसंस्थेच्या समोरील   पत्र्याच्या शेडमध्ये पोत्यात बांधून टाकलेला व सडलेल्या अवस्थेतील या महिलेचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. कुत्र्याने मृतदेहाचा एक हात तोडून रस्त्यावर टाकल्याने या  खुनाला वाचा फुटली. पोलिस रात्री उशिरापर्यंत संशयितांची कसून चौकशी करीत  होते. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : मृत महिला शहरातील माधवनगर रस्त्यालगत एका भाड्याच्या खोलीत राहत होती. ती  घरातून बेपत्ता झाल्याची फिर्याद रविवारी 7 जानेवारी रोजी कुपवाड पोलिसांत नोंद झाली होती. दरम्यान,  आज सकाळी त्या महिलेचा तुटलेला हात रस्त्यावर पडल्याची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना दिली. 

पोलिसांनी शेडमध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी पोत्यात बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळला. मृतदेहाचा पंचनामा सुरू  असताना त्या ठिकाणी लगतच राहत असलेल्या एका महिलेने ते दृष्य पाहून हंबरडा फोडला. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटली. मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केला. या तपासणीत महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र खुनाच्या कारणाचा नेमका अहवाल रात्री उशिरापर्यंत पोलिसांना मिळाला नव्हता. 

अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, निरीक्षक अशोक कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. मृताच्या नातेवाईक़ांकडून माहिती घेतली.  रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती.  संशयितांना लवकरच अटक करू असे  पोलिसांनी सांगितले.