Mon, Sep 24, 2018 16:54



होमपेज › Sangli › अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्‍़या वृध्देचा खून

अनैतिक संबंधास अडथळा ठरणाऱ्या वृध्देचा खून

Published On: Jan 17 2018 7:23PM | Last Updated: Jan 17 2018 7:23PM

बुकमार्क करा




कुपवाड : वार्ताहर

शहरातील श्रीमती इंदूबाई शिवाजी माने (वय-५२, रा.उल्हासनगर) या वृद्ध महिलेचा खून संशयित आरोपी संतोष लहू गवस (वय- 19, सध्या रा.कुपवाड,मूळ गाव फणसवाडी ता.दोडामार्ग, जि.सिंधुदुर्ग ) व त्याचा साथीदार उमेश आप्पाण्णा कुल्लोळी (वय-19,रा. नागराज कॉलनी, सांगली) या दोघांनी केला असून तिच्या मुलीबरोबर असलेल्या अनैतिक संबंधात ती अडथळा ठरत असल्याने तिला कायमचेच संपविल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी गुरूवारी (दि.11) सकाळी कुपवाड-माधवनगर रस्त्यालगत असलेल्या शिवाजी कोष्टी यांच्या घराच्या नवीन बांधकामाजवळील पत्र्याच्या शेडमध्ये पोत्यात बांधून टाकलेला व सडलेल्या अवस्थेत वृद्ध महिलेचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. मृतदेहाचा एक हात कुत्र्याने तोडून रस्त्यावर टाकल्याने हा खून उघडकीस आला. त्यामुळे कुपवाड पोलिसांनी गतीने तपास यंत्रणा राबवून गुरूवारी दिवसभर मृतांच्या नातेवाईकांची सखोल चौकशी केली असता हा खून संशयित आरोपी संतोष गवस यानेच केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले होते. 

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, मिरजेचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. धीरज पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. या खूनातील आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश त्यांनी कुपवाड पोलिसांना दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे, विश्वास वाघ यांनी फरारी आरोपींची शोधाशोध सुरू केली होती. 

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस संशयित आरोपीच्या मित्रावर करडी नजर लावून बसलेले होते. मंगळवारी सकाळी संशयितांनी त्याच्या सांगलीतील मित्रांशी मोबाईलवरून संपर्क साधला होता. पोलिसांनी तातडीने मित्रांना ताब्यात घेऊन संशयिताचे मोबाईल लोकेशन तपासले असता सदरचे आरोपी हे उमरमोडी (सज्जनगड) धरणाजवळ असलेले समजले. पोलिसांनी एका वाहनात त्याच्या मित्रांना व दुस-या वाहनात पोलिस बसून उमरमोडी धरण गाठले.

बुधवारी दुपारी त्या ठिकाणी गेल्यावर मित्रांनी संशयिताची भेट घेताच पोलिसांनी संशयिताना तातडीने ताब्यात घेऊन वृध्द महिलेच्या खूनाबाबत चौकशी केली असता वृध्द महिलेच्या मुली बरोबर संशयित संतोष गवस याचे अनैतिक संबंध होते. या संबंधास तिचा नेहमी अडथळा येत असल्याने गवस याने आपला मित्र उमेश कुल्लोळी याच्या मदतीने शनिवारी(दि.6) सायंकाळी वृध्द महिलेला आपल्या भाड्याच्या खोलीत बोलावून घेऊन एकाने तिचे तोंड दाबून धरले तर गवसने पट्ट्याने तिचा गळा आवळला या झटापटीत तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला होता. 

तीन दिवस मृतदेह गवसच्या खोलीत 
गवसने महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून आपल्या खोलीत ठेवला होता. त्यानंतर पोत्यातून उग्र वास येवू लागल्याने गवसने मित्राच्या साथीने अंधाराचा फायदा घेऊन समोरच्या पत्र्याच्या शेडमध्ये टाकून दोघेही फरार झाले होते. 

नातेवाईकांबरोबर आरोपीने केली शोधाशोध 
शनिवारी (दि.6) संध्याकाळी इंदूबाई माने ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या मुलीने कुपवाड पोलिसात दिली होती. त्या दिवशी आरोपी स्वतः हजर होता. तसेच तीन दिवस तो नातेवाईकाबरोबर बेपत्ता महिलेचा शोध घेत होता. 

दोन्ही आरोपीवर विश्रामबाग पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल 
संशयित आरोपी संतोष गवस व त्याचा साथीदार उमेश कुल्लोळी या दोघांनी विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2015 साली एकाचा खून केलेला होता. या दोघांच्या विरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.