Fri, Jul 19, 2019 22:01होमपेज › Sangli › कुंडल येथील एकास ११ लाखांचा गंडा

कुंडल येथील एकास ११ लाखांचा गंडा

Published On: Jan 22 2018 1:23AM | Last Updated: Jan 22 2018 1:23AMकुंडल :  वार्ताहर

पीएफ व एलआयसीमधील 70 लाख रुपये काढून देण्याचे आमिष दाखवून कुंडल (ता. पलूस) येथील एकाला 11 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली. याप्रकरणी भीमराव तुकाराम लाड (रा. क्रांतीनगर, कुंडल) यांनी कुंडल पोलिसांत फिर्याद दिली. याप्रकरणी दोन महिलांसह पाच एजंटाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

कुंडल पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, भीमराव लाड हे दूरसंचार विभागात सांगली, सातारा जिल्ह्यात नोकरी करीत होते. ते नुकतेच निवृत्त झाले. त्यानंतर दूरसंचार खात्यामार्फत जमा झालेली पीएफ व एलआयसीमध्ये असलेली सुमारे 70 लाखांची रक्‍कम काढायची होती. त्यासाठी न्यू दिल्ली येथील आर. के. तिवारी, अभितसिंह राठोड, सोनिया मिश्रा,  बंगळुरू येथील   बलराज सचदेव व मुंबई येथील पुजा गुप्ता या पाच जणांनी लाड यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी लाड यांना पीएफ व एलआयसीमधील 70 लाख रुपये तातडीने काढून देण्याचे आमिष दाखविले. त्या बदल्यात कमिशन म्हणून काही रक्कम व लाड यांची कागदपत्रे देण्याचे ठरले. त्यानुसार लाड यांनी कागदपत्रे दिली. तसेच एजंट तिवारी याने सांगितलेल्या बँक खात्यावर 23 मार्च 2017 ते 9 नोव्हेंबर 2017 या  कालावधीत तसेच चेक व कुरियरच्या माध्यमातून सुमारे 11 लाख  6 हजार रूपये पाठवून दिले.  

पैसे पाठवूनही रक्कम मिळत नसल्याचे लाड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एजंटांकडे 70 लाखाविषयी विचारणा सुरू केली. परंतु पैसे काढून देण्याविषयी सर्व एजंट टाळाटाळ करू लागले. त्यानंतर लाड यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी रविवारी कुंडल पोलिसात तिवारी, राठोड, सोनिया मिश्रा,  सचदेव व पुजा गुप्ता यांच्याविरोधात फिर्याद दिली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जयश्री पाटील करीत आहेत.