Wed, Jul 17, 2019 12:12होमपेज › Sangli › कोयनेत हेलिकॉप्टरचा संशयास्पद वावर 

कोयनेत हेलिकॉप्टरचा संशयास्पद वावर 

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 09 2018 11:29PM

बुकमार्क करा
पाटण : गणेशचंद्र पिसाळ 

पाटण व कोयना विभागात गेल्या दोन महिन्यांपासून हेलिकॉप्टर संशयास्पदरित्या फिरत आहे. याबाबत पोलिस अथवा महसूल विभागांकडे कोणत्याही प्रकारची माहिती नाही. वास्तविक याच विभागात कोयना धरण यासह हेलिकॉप्टरसाठी मज्जाव असणारे कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प असतानाही या हेलिकॉप्टरच्या संशयास्पद फेर्‍याबाबत प्रशासन शांत का, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

पाटण तालुक्यात अनेक संवेदनशील विभाग आहेत. प्रामुख्याने कोयना धरण, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्‍चिम घाट व इको सेन्सिटिव्ह प्रकल्प यासह याठिकाणची जंगले वन्यजीव या पार्श्‍वभूमीवर येथे कमालीची सतर्कता बाळगली जाते.  मात्र, जंगलात केवळ फिरताना स्थानिक भूमिपुत्रांना कडक नियम, कायदे व निर्बंध घालणारे वन व वन्यजीव विभाग मात्र, अशा हेलिकॉप्टर बाबत अनभिज्ञ कसे हा संशोधनाचा विषय बनला आहे. अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प असल्याने याठिकाणी हेलिकॉप्टरसाठी बंदी व बंधने असतानाही हेलिकॉप्टरचा वावर चर्चेचा विषय ठरले आहे. 

दरम्यान, कोयना धरण सुरक्षेचा बागुलबुवा करून येथे शिवसागर जलाशयातील पर्यटकांसाठीचे बोटिंग बंद करण्यात आले. स्थानिकांनाही लाँचबाबत सुरक्षेच्या निर्बंध लादले. मग हाच प्रशासकीय विभाग हेलिकॉप्टर बाबत मुग गिळून गप्प का ? याबाबत तक्रार तर सोडाच साधी माहितीही महसूल किंवा पोलिस यंत्रणांकडे नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

पोलिसांसह संबंधित विभागांनी या हेलिकॉप्टरची गंभीर दखल घ्यावी. हे नक्की कोणाचे, कोणत्या कंपनीचे व त्याचा हेतू तपासावा. संवेदनशील ठिकाणी बंदी असतानाही कधी दिवसा तर कधी रात्रीच्या फेर्‍या मारणार्‍या या हेलिकॉप्टरचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालय अनभिज्ञ 
संशयास्पद हेलिकॉप्टरच्या फेर्‍यांबाबत स्थानिक पोलिस व महसूल विभागाकडे चौकशी केली असता त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क केला असता त्यांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. हेलिकॉप्टर उड्डाण किंवा उतरण्याबाबतचा परवानगी अहवाल आमच्याकडे असतो. मात्र संबंधित हेलिकॉप्टरच्या 
फेर्‍यांबाबत प्रशासनाकडे कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.