Tue, Apr 23, 2019 02:03होमपेज › Sangli › चाकूच्या धाकाने तिघांना लुटले

चाकूच्या धाकाने तिघांना लुटले

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 26 2018 12:05AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील वखारभागातील  त्रिमूर्ती थिएटर परिसरात एका युवकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील दीड तोळ्यांची अंगठी, सात हजारांची रोकड असा पन्‍नास हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. पद्माळे रस्त्यावर मौजे डिग्रज फाटा येथे एका युवकाला अडवून एक मोबाईल, रोकड असा पंधरा हजारांचा तर माधवनगरमध्ये अकरा हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. शनिवारी एका रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान या तीनही घटना घडल्या. याबाबत सांगली शहर, सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी भालचंद्र मधुकर ढोबळे (वय 31, रा. केशव कॉलनी, चिंतामणीनगर) याने फिर्याद दिली आहे. भालचंद्र शनिवारी रात्री कामानिमित्त कोल्हापूर रस्ता परिसरात गेला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास तो मोटारसायकलवरून घरी जाण्यास निघाला. वखारभागातील त्रिमूर्ती थिएटरजवळ आल्यानंतर मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्याच्या आडवी गाडी मारून त्याला थांबविले. 

त्यानंतर त्याला चाकूचा धाक दाखवून, जीवे मारण्याची धमकी देऊन  त्याच्या बोटातील दीड तोळ्यांची अंगठी तसेच खिशातील सात हजारांची रोकड लंपास केली. त्यानंतर भालचंद्रने आरडा-ओरडा केला मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. त्यानंतर त्याने थेट सांगली शहर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तिघांविरोधात लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पद्माळे रस्त्यावरील मौजे डिग्रज फाटा येथे चंद्रकांत वसंत सावळे (वय 40) यांनाही तोंडाला रूमाल बांधून मोटारसायकलवरून आलेल्या तीन युवकांनी गाडी आडवी मारून थांबविले. त्यांना चाकूचा दाखवून जीवे मारण्याची धमकी  देऊन त्यांच्याकडील

एक मोबाईल आणि साडेचार हजारांची रोकड लंपास करण्यात आली. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली. तर माधवनगर येथील पत्रा डेपोच्या पुढच्या बाजूस अमितकुमार रामचंद्र माळी (वय 29, रा. कवलापूर) यालाही अज्ञात तिघांनी गाडी आडवी मारून अडविले. त्यालाही चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील एक मोबाईल, पाच हजारांची रोकड असा अकरा हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. या दोन्ही घटनांबाबत सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. 

तीनही घटनांत कमालीचे साम्य

दरम्यान सांगलीतील वखारभाग, मौजे डिग्रज फाटा आणि माधवनगरमध्ये घडलेल्या तीनही घटनांमध्ये कमालीचे साम्य आहे. केवळ अर्ध्या ते पाऊण तासांच्या अंतरात या तीनही घटना घडल्याने त्याच तीन चोरट्यांनी या तिघांना लुटल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. एका रात्रीत तिघांना लुटल्यामुळे खळबळ उडाली  असून यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.