Mon, Mar 25, 2019 17:25होमपेज › Sangli › सांगलीत तरुणाचा मेहुण्यावर चाकूहल्ला

सांगलीत तरुणाचा मेहुण्यावर चाकूहल्ला

Published On: Aug 07 2018 1:01AM | Last Updated: Aug 07 2018 1:01AMसांगली : प्रतिनिधी

बहिणीला मारहाण करुन त्रास देणार्‍या भाऊजीला जाब विचारण्यास गेलेल्या मेहुण्यावरच भाऊजीने चाकूहल्ला केला. यामध्ये सचिन सदाशिव व्हन्ने (वय 26, रा. गांधी हॉस्पिटलजवळ, विश्रामबाग) जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी दुपारी टाटा पेट्रोलपंपासमोर घडली. याप्रकरणी भाऊजीविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मारुती आप्पासो देवकर (रा. कुपवाड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. मारुती देवकर याचा विवाह सचिन व्हन्ने याच्या बहिणीशी झाला आहे. त्याचे टाटा पेट्रोलपंपासमोर कल्पद्रुम मैदानाकडे जाणार्‍या रोडवर शौर्य जेन्टस पार्लर नावाचे दुकान आहे. मारूती देवकर नेहमी पत्नीस शिवीगाळ करुन मारहाण करत होता. त्यामुळे काल (रविवारी) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सचिन हा काहीजणांना सोबत घेऊन मारुती देवकरला समजून सांगण्यासाठी गेला होता. त्यावेळी देवकरने व्हन्नेला शिवीगाळ केली होती. त्यामुळे व्हन्ने याचे नातेवाईक सोमवारी दुपारी गावाकडून सांगलीत आले होते. त्यांनीही मारुती देवकर याच्या दुकानात जाऊन त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. 

त्यावेळी देवकर याने नातेवाईकांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच सचिन व्हन्ने याच्यावर चाकूने वार केला. यामध्ये वार चुकवण्यासाठी व्हन्ने याने हात मध्ये घातला. त्यामुळे हातावर वार बसल्याने तो जखमी झाला आहे.