Wed, Mar 20, 2019 12:42होमपेज › Sangli › मतदार नोंदणीसाठी बालवाड्यांना टाळे

मतदार नोंदणीसाठी बालवाड्यांना टाळे

Published On: Dec 06 2017 1:41AM | Last Updated: Dec 05 2017 11:23PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

मतदार नोंदणीसाठी सांगलीतील दोन शाळांची तीन शिक्षकांची नियुक्‍ती केली आहे. त्यामुळे तेथे 250 हून अधिक विद्यार्थी असताना 15 टाळे ठोकल्याबद्दल स्वाभिमानीचे नगरसेवक गौतम पवार यांच्यासह सदस्यांनी मंगळवारी महासभेत पंचनामा केला. महापालिकेतील अनेक कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या मतदार नोंदणीच्या नावे कार्यालयात दीड महिने दांड्याच सुरू असल्याबद्दल संताप व्यक्‍त केला. 

महापौर हारुण शिकलगार यांच्या सूचनेनुसार प्रभारी उपायुक्‍त सुनील पवार यांनी निवडणूक आयोगाला याबाबत कळवण्यात येईल. त्या शिक्षकांची मतदार नोंदणीच्या कामावरील नियुक्ती  रद्द करण्याची मागणी करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

गौतम पवार म्हणाले, सांगलीतील त्रिकोणी बाग आणि हिराबाग वॉटर वर्क्स या दोन्ही बालवाड्यांत दोन शिक्षिका आणि एक मुख्याध्यापक आहेत. परंतु या शिक्षकांना गेल्या दीड महिन्यांपासून मतदार नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. त्यामुळे शाळा बंद करून त्यांना ते काम करावे लागते. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे डिसेंबर आला तरी विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले नाहीत. एकूणच प्रशासनाचा  बोगस कारभार सुरू आहे. 

याप्रकरणी सहाय्यक आयुक्‍त एस. व्ही. पाटील म्हणाले, दोनच दिवसांत टेंडर काढून गणवेश देऊ. पवार म्हणाले, गणवेशासाठी दोन लाखांची तरतूद केली आहे. मग गणवेशाबाबत  आठ महिने विलंब कशासाठी? शिक्षक नाहीत, गणवेश नाहीत. एकूणच या शाळा बंद करण्याची सुपारी घेतली आहे का? 

यावर सुनील पवार म्हणाले, ही नियुक्‍ती आम्ही नव्हे; तर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने केली आहे. शासनाला कळवून त्यांची नियुक्ती तत्काळ रद्द करू. राजू गवळी म्हणाले, मतदारनोंदणीच्या नावे अधिकारी, कर्मचारी सुटीच एन्जॉय करीत आहेत. त्यांनी किती नोंद केली, याचा लेखाजोखा मागा.