Sat, Apr 20, 2019 10:29होमपेज › Sangli › बामणोलीचे दोघे अपघातात ठार

बामणोलीचे दोघे अपघातात ठार

Published On: Dec 18 2017 2:42AM | Last Updated: Dec 17 2017 11:59PM

बुकमार्क करा

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी 

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय मार्गावरील लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) गावाजवळ दुचाकी व कार यांच्यात  झालेल्या अपघातात बामणोली (ता. मिरज) येथील दोन शालेय विद्यार्थी ठार झाले, तर एक जण जखमी झाला आहे. राहुल बाळू कांबळे  (वय 21),  रामजित मुन्ना यादव (वय 12) असे ठार झालेल्या मुलांची नावे आहेत. सुमंत तारकेश्‍वर राजबर (वय 14) हा जखमी झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली  अधिक माहिती अशी, बामणोली (ता. मिरज) तीन शालेय विद्यार्थी  नागज (ता. कवठेमहांकाळ) येथे धावण्याच्या स्पर्धेसाठी आले होते.

दुपारी स्पर्धा संपल्यानंतर तिघेही  एकाच  दुचाकी (एम . एच . 10 - बी. एफ. 3008) वरून नागजहून  बामणोलीकडे जात होते. याचवेळी यांच्या पुढे चारचाकी कार (टी. एस. 09- पी. बी. 2606) पंढरपूरहून मिरजकडे जात होती. दोन्ही वाहने लांडगेवाडी जवळ आली असता दुचाकी कारवर जाऊन आदळली. यात राहुल कांबळे हा जागीच ठार झाला. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना रामजीत यादव याचाही मृत्यू झाला. सुमंत राजबर हा जखमी असून याच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.