होमपेज › Sangli › भाजप सरकारकडून शेतकरी, जनतेची फसवणूक

भाजप सरकारकडून शेतकरी, जनतेची फसवणूक

Published On: Sep 02 2018 1:17AM | Last Updated: Sep 01 2018 11:28PMकडेगाव : शहर प्रतिनिधी 

केंद्र  व राज्यातील भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत सर्वसामान्य, गोरगरीब  शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. त्यांना  वेठीस धरले आहे.  सामान्य लोकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यांचा हा राग शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसतर्फे राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू आहे, अशी माहिती  युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  आमदार डॉ.विश्‍वजीत कदम यांनी दिली.

तालुक्यातील सोनहिरा साखर कारखाना कार्यस्थळावर  आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  रघुनाथ कदम, युवा नेते डॉ.जितेश कदम उपस्थित होते.डॉ. कदम म्हणाले, भाजप सरकारच्या कारकीर्दीत  युवकांना  नोकर्‍या नाहीत. महिलांवर अत्याचार होत आहेत. त्या असुरक्षित आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.  महागाई असह्य झाली आहे. त्यामुळे भाजप सरकारबद्दल समाजातील प्रत्येक स्तरात असंतोष आहे. या सगळ्याचा आता उद्रेक होत आहे.

ते म्हणाले,   रविवारी (दि.2) रोजी  कडेगाव, पलूस व जत या ग्रामीण भागात ही संघर्ष यात्रा येत आहे. या संघर्ष यात्रेचे मोठ्या प्रमाणात नियोजन काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले आहे.  कडेगाव येथे  सभा होणार आहे. 

या भागाचे भाग्यविधाते माजी मंत्री (स्व.)आमदार डॉ. पतंगराव कदम  यांनी पस्तीस वर्षे या भागाचे नेतृत्व केले. काँग्रेस पक्षाचे अत्यंत निष्ठावंत नेते  होते. अतिशय निष्ठने त्यांनी या भागात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. प्रदीर्घ काळ राज्याचे मंत्री म्हणून काम करताना त्यांनी केलेल्या कामामुळे या भागाची वेगळी ओळख  राज्यात तयार झाली आहे. हे सगळे काँग्रेस पक्षामुळे आणि पक्षाच्या विचारांमुळेच शक्य झाले आहे. ते म्हणाले, (स्व.) डॉ.कदम यांच्या  पश्‍चात याठिकाणी हा मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्यासाठी सर्वसामान्य शेतकरी आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेे.