Fri, Apr 26, 2019 18:00होमपेज › Sangli › सांगली : कचरेवाडीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या

सांगली : कचरेवाडीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या

Published On: Mar 25 2018 11:04PM | Last Updated: Mar 25 2018 11:04PMतासगाव : शहर प्रतिनिधी

कचरेवाडी (ता. तासगाव) येथे कचरेवाडी ते पेड रस्त्यावर  बाटे मळ्यात प्रेमी युगुलाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २५) सायंकाळी उघडकीस आली. आकाश पांडूरंग साळुंखे (वय २३, रा. निंबळक) आणि माधुरी संजय पाटील(वय १९, रा. बोरगाव) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येच्या घटनेने तासगाव तालुक्यात खळबळ ऊडाली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, रविवारी सायंकाळच्या सुमारास कचरेवाडी येथील बाटे मळा परिसरातील एका शेतात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचे आढळून आले होते. कचरेवाडीतून पेडला जाण्यासाठी जुना रस्ता आहे. कचरेवाडीपासून दोन किलोमीटर अंतरावर रस्यालगत दुचाकी दिसून येत होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास दुचाकीपासून काही अंतरावर डोंगराकडील बाजूस या प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.

याघटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक अशोक बनकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांच्यासह पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आकाश आणि माधुरीचा मृतदेह काही अंतरावर पडलेले होते. दोघांचेही मृतदेहातून दुर्गधीं येत होती. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर त्यांचा उलगडा झाला.

निंबळक येथील आकाश पांडुरंग साळुंखे हा तरुण शुक्रवारपासून घरातून बेपत्ता होता. घरातून कामाला जातो असे सांगून तो घराबाहेर पडला. घरातून जाताना तो (एमएच १० डीवाय ४९१५) या दुचाकीवरुन घराबाहेर पडला होता. मात्र तो परत घरी आला नाही. याबाबत त्याच्या आईवडीलांनी तासगाव पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती.

नेमके याचवेळी बोरगाव येथून माधुरी संजय पाटील ही तरुणीही पाहुण्यांकडे जाते असे सांगून घराबाहेर पडली. मात्र ती पाहुण्यांच्या घरात पोहचली नाही. त्यामुळे तिच्याही आई वडीलांनी सर्व पाहुण्यांकडे शोधाशोध सुरु केली होती. मात्र रविवारी या दोघांनीही विषारी औषध प्राषण करुन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

प्रेमप्रकरणातून आत्महत्या

माधुरीच्या मामाचे गाव निंबळक आहे. त्यामुळे माधुरीचे मामाच्या गावात येणे जाणे होते. मामाच्या गावातील आकाश आणि माधुरीची ओळख झाली होती. सहा महिन्यांपासून त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरु असल्याची चर्चा सुरु होती. माधुरीचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या घरी आई, वडील आणि एक अविवाहित बहीण आहे तर आकाशच्या घरी आई, वडील आहेत. आकाशचे शिक्षण पाचवीपर्यंतच झालेले होते. दोघांनीही प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याने बोरगाव, निंबळक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.