Tue, Apr 23, 2019 21:35होमपेज › Sangli › एस.टी.वाहकाला मिळाला 26 वर्षांनी न्याय

एस.टी.वाहकाला मिळाला 26 वर्षांनी न्याय

Published On: Aug 10 2018 12:59AM | Last Updated: Aug 09 2018 7:14PMसांगली : प्रतिनिधी

सव्वीस वर्षापूर्वी तिकीट न देता 1 रुपया 25 पैसे घेतल्याच्या कारणावरून वाळवा तालुक्यातील बहाद्दूरवाडीच्या महादेव श्रीपती खोत   या वाहकाला बडतर्फ केले होते. याबाबत उच्च न्यायालयाने ही बडतर्फी रद्द करून गेल्या 22 वर्षाचा पूर्ण पगार देण्याचा आदेश देण्यात आला. 

1992 मध्ये खोत हे सांगली- मिरज शहर वाहतुकीसाठी वाहक म्हणून काम करीत होते. राममंदिर ते सिटी पोष्ट या दरम्यान त्यांनी एका प्रवाशाकडून केवळ 1 रुपये 25 पैसे घेऊन त्यांना तिकीट न दिल्याचा त्यांच्यावर  आरोप होता. त्यामुळे त्यांना 1992 मध्ये बडतर्फ करण्यात आले होते. खोत यांनी  बडतर्फीविरोधात न्यायालयीन लढा सुरू केला. औद्योगिक न्यायालय व कामगार न्यायालयात त्यांना न्याय मिळत नव्हता. शेवटी उच्च न्यायालयात त्यांनी दाद मागितली. त्यानंतर उच्च न्यायालयातील वकील उमेश माणकापुरे यांनी खोत यांची बाजू मांडली. याप्रकरणी पैसे न वाढणे व प्रवाशांच्या जबाबातील विसंगती विचारात घेऊन बडतर्फीचा आदेश रद्द करावा, असा युक्‍तीवाद अ‍ॅड. माणकापुरे यांनी केला. एस. टी. चे ज्येष्ठ वकील जी. एस. हेगडे यांनीही युक्तीवाद केला. न्यायमूर्ती गुप्ते यांनी कामगार व औद्योगिक न्यायालयावर आक्षेप नोंदवत खोत यांची बडतर्फी रद्दबातल करण्याचा आदेश दिला. तसेच 1993 पासून सेवानिवृत्तीच्या काळापर्यंतचे म्हणजे 2014 पर्यंतचा पूर्ण पगार व सेवा लाभ देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) ने या दाव्याचा पाठपुरावा केला होता. अखेर खोत यांना तब्बल 26 वर्षांनी न्याय मिळाला.  

नोकरी गेली तरी कष्टातून संसार उभा केला : खोत

महादेव खोत म्हणाले, 1992 ला एस. टी. महामंडळाने केवळ सव्वा रुपयासाठी बडतर्फ केले. त्यानंतर आमची आयुष्याची फरफट झाली. समाजात बदनामी झाली. पदरी मुलगा आणि मुलगी अशी दोन मुले, पत्नी. अशा काळात आम्हाला घरातूनही बाजूला ठेवले. कुटुंब जगवायचे होते. मोलमजुरी सुरू केले. पडेल ते काम करणे सुरू केले. अशा परिस्थितीत मुलांना वाढविले. माझ्यावर अन्याय झालेला होता. बडतर्फीविरोधात न्यायालयात दाद मागितले. शेवटी मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पाठपुरावा केला. दर महिन्याला खर्च येत होता. यात माझ्या पत्नीनेही तक्रार न करता साथ दिली. मुले पदवीधर झाली. मुलगा सध्या नोकरी करतोय. मुलीचे लग्न झालेले आहे. तब्बल सव्वीस वर्षाने मला न्याय मिळाला.